अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:31+5:302021-04-21T04:28:31+5:30
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या वाढत असून नागरिक वाट्टेल तिथे घरे बांधत आहे. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या ...
चंद्रपूर : शहरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या वाढत असून नागरिक वाट्टेल तिथे घरे बांधत आहे. शासकीय जमिनीवरही अनेकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमण हटवून रस्ते तसेच शासकीय जागा मोकळ्या करण्याची मागणी केली जात आहे.
रोजगाराअभावी बेरोजगारांत संताप
चंद्रपूर : ‘औद्योगिक शहर’ अशी चंद्रपूरची ओळख आहे. मात्र, बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामे बंद आहेत. त्यामुळे बेरोजगारांची नोंदणी करून त्यांना मदत देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील विविध वार्डामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाळण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. मात्र, वेळीच दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
घंटागाड्यांची दुुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : शहरात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र, काही वाॅर्डातील घंटागाड्यांची दुरावस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कचरा ट्राली दुरूस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. जनता कर्फ्यू असल्याने सर्वजण घरीच राहणार आहेत. त्यामुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नेटवर्क पुरविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी थकबाकी मिळण्याच्या प्रतीक्षेत
चंद्रपूर : मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. मलेरिया प्रतिबंधक फवारणी कामगारांना सहावा वेतन आयोग पाच वर्षे उशिराने लागू करण्यात आला. दरम्यान, या कालखंडातील थकबाकी कामगारांना अद्याप देण्यात आली नाही.
स्वच्छतेअभावी नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरातील काही वॉर्डात घाणीचे साम्राज्य आहे. बिनबा वॉर्डातील नाल्याचा उपसा होत नाही. त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे.
गंजवार्डातील रस्त्याचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील भाजी बाजार असलेल्या गंजवार्डातील रस्त्याचे सिमेंटीकरण केले जात आहे. मात्र, काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
मोबाईलमुळे डोळ्यांचे आजार वाढले
चंद्रपूर : ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना नाईलाजाने मुलांकडे मोबाईल द्यावे लागत आहे. मात्र, त्यांचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. मुलांना डोळ्यांचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा मुले अभ्यास कमी आणि मोबाईल इतरत्र कामासाठी वापरत आहे. त्यामुळे त्याचे भविष्यात दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.
चेंबर ठरताहेत धोकादायक
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे. काही महिन्यांमध्ये पावसाचे दिवस येणार आहे. या दिवसामध्ये उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता आहे.
भंगार वाहनांचा लिलाव करावा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील विविध कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने आहे. मात्र, या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे जागा रिकामी करावी, अशी मागणी आहे.
एटीएम केंद्राची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरात विविध बँकांनी एटीएम केंद्र सुरू केले आहे. काही एटीएमची नियमित स्वच्छता होत असली तरी काही केंद्रात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळत आहे. त्यामुळे या केंद्राची नियमित तपासणी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
बांधकाम व्यावसायिक धास्तावले
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले असून शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिणामी बांधकाम व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलावरील माती उचलावी
चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाणपूल आहे. मात्र, या पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे.
शहराचे विद्रुपीकरण अद्यापही सुरूच
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौका-चौकांत मोठ-मोठे होल्डिंग लावले जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने यासंदर्भात कडक कारवाईचा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय हवेतच विरला आहे.
कचरा संकलकांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र, काही वाॅर्डातील संकलकांची संख्या कमी असल्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. कर्मचाऱ्यांची पाच वर्षापूर्वी नियुक्ती करताना त्यावेळची लोकसंख्या विचारात घेण्यात आली होती. मात्र, आता लोकसंख्या वाढली असतानाही कर्मचारी संख्या मात्र तेवढीच आहे.
बेरोजगार संस्थांना हवे काम
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात आले आहे. यामध्ये बेरोजगार संस्थाही कामे नसल्यामुळे अडचणीस सापडल्या आहे. त्यामुळे शासनाने या संस्थांनाही छोटे-मोठे काम देऊन संस्थांना रूळावर आणावे, अशी मागणी केली जात आहे.