घोडाझरीच्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी
By admin | Published: July 27, 2016 01:16 AM2016-07-27T01:16:38+5:302016-07-27T01:16:38+5:30
घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
इंग्रजकालीन वास्तू : निकृष्ट दर्जाचे बांधकाम
तळोधी (बा.): घोडाझरी तलावाअंतर्गत येत असलेल्या मुख्य कालव्याचा अनेक ठिकाणी भेगा व मध्यभागी छिद्र पडलेले असून सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप घोडाझरी लाभ क्षेत्रातील नागरिकांनी केला आहे.
१९०५ मध्ये घोडाझरी तलावाची निर्मिती झाली असून त्याअंतर्गत जवळपास सात हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरविल्या जाते. मुख्य ठिकाणाहून हुमा वितरिका, तळोधी वितरिका, सावरगाव वितरिका, गिरगाव वितरिका, गडबोरी वितरिकाद्वारे पाणी वाटप केले जाते. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटच्या भेगा पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कालव्याची पार फुटलेली आहे. तर मध्यभागी अनेक ठिकाणी छिद्र पडलेले आहेत. तसेच मुख्य कालव्याचा उपसा न केल्यामुळे झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाकडे लक्ष घालून पाणी वाटपामुळे दुरुस्ती करण्याची मागणी लाभधारकांनी केली आहे. (वार्ताहर)
दरवर्षी या तलावाच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी कालव्यांची पार फूटते व सतत आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा बंद राहतो. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी-शेतमजुरांना संकटाला समोर जावे लागते. तरी पाणी वाटपाच्या पूर्वीच कालव्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्यात यावी व लाभ धारकाला घोडाझरी पाण्याचा फायदा व्हावा अशी मागणी केली आहे.
- खोजराम मस्कोल्हे, माजी सभापती, पंचायत समिती, नागभीड