बल्लारपुरातील राणी महालाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
By admin | Published: April 12, 2015 12:49 AM2015-04-12T00:49:11+5:302015-04-12T00:49:11+5:30
बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे.
बल्लारपूर : बल्लारपूर येथे वर्धा नदीच्या तीरावर गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला सुमारे ७०० वर्षांपासून उभा आहे.
या किल्ल्याचा काही भाग काळानुरुप ढासळला असला तरी काही वास्तू अजुनही चांगल्या स्थितीत आहेत. त्यात नदीच्या अगदी काठावरील राणी महाल आहे. मजबूत बांधणीचा हा महाल देखणा आहे. या महालाच्या गच्चीवर उभे राहून नदीकडील व चौफेर दृष्य न्याहाळता येते. वर्धा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी लोक महालाच्या याच गच्चीवर येतात. पुराच्या दिवसांत हा परिसर गजबजून जात असतो. इतर दिवशीही किल्ला बघणारे या राणी महालाच्या गच्चीवर जातातच. या महालाच्या गच्चीवर जाण्यासाठी दोन बाजुंनी पायऱ्या आहेत. अरुंद असलेल्या या पायऱ्यांना काही ठिकाणी तडे गेले आहेत. एक दोन ठिकाणी तर मोठे भगदाड पडले असून आतील भाग पोकळ आहे.
या पायरीवरुन वर चढताना पोकळ झालेल्या भागात पाय जाणार तर नाही ना, अशी भीती निर्माण होते. पायरीचा भाग उघडा पडून असल्याने पावसाचे पाणी आत शिरुन पायरीचा भाग दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यामुळे पायरीचा भेगा पडलेला भाग दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक आहे. महाल आणि त्यावरील गच्ची मजबूत आहे. जीर्ण झालेल्या त्याच्या पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी इतिहास प्रेमींची आहे.
किल्ल्यातील आतील भागातील कचरा साफ केल्यामुळे किल्ला बघणाऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे, हे विशेष ! त्यामुळे, किल्ल्यात उगविणारे गवत व इतर झाडे वेळोवेळी काढत राहणे आवश्यक आहे. काहीजण आपली नाव कोरुन महालाच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)