श्री दत्तमंदिराच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:30+5:302021-06-26T04:20:30+5:30
भिसी : येथून तीन किमी अंतरावरील चिंचोली गावाजवळच्या अडगाळ टेकडीवरील श्री दत्तमंदिरापर्यंत सिमेंट रस्ता बांधून द्यावा, जीर्ण मंदिराच्या दुरुस्तीची ...
भिसी : येथून तीन किमी अंतरावरील चिंचोली गावाजवळच्या अडगाळ टेकडीवरील श्री दत्तमंदिरापर्यंत सिमेंट रस्ता बांधून द्यावा, जीर्ण मंदिराच्या दुरुस्तीची व या स्थळाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ घोषित करण्याची मागणी श्री दत्त मंदिर अडगाळ टेकडी संस्थेचे अध्यक्ष भानुदास धोटे व मंदिरात स्थायी निवास करणाऱ्या साधूंनी व महानुभाव पंथीय नागरिकांनी केली आहे.
अडगाळ टेकडीवर महानुभाव पंथीयांचे श्री दत्तमंदिर सव्वाशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. आता अस्तित्वात असलेले मंदिर ३५ वर्षांपूर्वी बांधलेले आहे. हे मंदिर चिंचोलीजवळच्या डोंगरावर, जंगलात आहे. येथे वाघ व अन्य वन्यप्राण्यांचाही संचार असतो. येथे ३०- ४० वृद्ध साधू स्थायी स्वरूपात निवास करतात. परंतु मंदिरापर्यंत चारचाकी वाहन जात नाही. वाटेत मोठे दगड आहेत. दुचाकी कशीबशी जाते. पण अपघाताची शक्यता अधिक असते. वृद्ध साधूंना जाण्या-येण्यासाठी खूप त्रास होतो. शिवाय येथे देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांनाही रस्ता चांगला नसल्यामुळे त्रास होतो. या मंदिरापर्यंत वीजपुरवठा पोहोचावा म्हणून ना. विजय वडेट्टीवार यांनी मदत केली होती. अशीच मदत पुन्हा पालकमंत्री या नात्याने वडेट्टीवार व आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी करावी, अशी मागणी मंदिर ट्रस्ट व महानुभाव पंथीय नागरिकांनी केली आहे.