विंजासन प्रभागातील समस्या सोडविण्याची मागणी
By admin | Published: November 10, 2016 02:06 AM2016-11-10T02:06:08+5:302016-11-10T02:06:08+5:30
शहरातील विंजासन प्रभाग हा समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी
भद्रावती : शहरातील विंजासन प्रभाग हा समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात याकरिता भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
विंजासन प्रभागांतर्गत येणारा नागमंदिर ते विंजासन हा रस्ता जागोजागी उखडला आहे. पारेलवार दूध डेअरीपासून बंगाली कॉलनीकडे जाणारा रस्त्याचे डांबरीकरण अनेक दिवसांपासून रखडले आहे. तसेच विंजासन-एकतानगर, कुंभारबोडी-विंजासन या मार्गावरही समस्या आहे. मंजूर झालेल्या नाल्याचे काँक्रीटीकरण, मोकळ्या जागेचे सौंदर्यीकरण, सुरक्षानगरमधील रस्त्याच्या दुतर्फा पेवर्स ब्लॉक लावणे, भवानीमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, मंदिराचे सौंदर्यीकरण, २००१ पूर्वी असणाऱ्या झोपडपट्टीवासींना जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक हजारे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी विनोद जाधव यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात अशोक हजारे, सुनील नामोजवार, प्रशांत आखरे, प्रशांत कटलावार, निलेश जुनारकर, गजानन घुगल, महेश तराळे, आशिष पोटे, अविश मत्ते, विवेक राखुंडे आदींचा समावेश होता.