रपट्याचे रुपांतर पुलात करण्याची मागणी
By admin | Published: April 10, 2015 12:59 AM2015-04-10T00:59:37+5:302015-04-10T00:59:37+5:30
मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे.
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव राजकीयदृष्टया संवेदनशिल म्हणून परिचत आहे. आजपर्यंतच्या मूल पंचायत समितीच्या इतिहासात भेजगाव येथील रहिवासी असलेल्या पाच व्यक्तींची मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ही बाब भेजगावच्या गौरवाची असली तरी विकास मात्र शून्य आहे.
या परिसरात भेजगाव केंद्रस्थानी असून परिसरात १५ गावे आहेत. हळदी-भेजगाव या गावांच्या शिवेवरुन उमा नदी वाहते. या नदीवर जवळपास ३० वर्षांपूर्वी रपटा बांधण्यात आला. मात्र काळानुरुप या रस्त्यावरुन रहदारी वाढली. मात्र या नदीवरील रपट्याचे पुलात रुपांतर झाले नाही. हा रस्ता कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत बंद राहतो. पावसाळ्याच्या दिवसात १५-१५ दिवस हा मार्ग पाण्याखाली राहतो. कधी मोठमाठे भगदाड तर कधी मधोमधे पुल दबल्याचा प्रकारही घडला आहे.
भेजगाव परिसरातील भेजगाव, दुगाळा माल, चकदुधाळा, भेजाळी, बाबराळा, सिंतळा, रेगडी, येरगाव, पिपरीदीक्षित, चकबेंबाळ, चकघोसरी, थेरगाव आदी गावातील नागरिकांचे या पुलामुळे जनजीवन विस्कळीत होते. विद्यार्थ्यांचे शिक्षण, परिसरात ओलिताची शेती करीत असल्याने व दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेपासून मुकावे लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील चिंचाळा येथे असल्याने बॅकींग सेवेपासूनही मुकावे लागत आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेअंतर्गत आहे. पुलाच्या बांधकामाची अंदाजित रक्कम चारवर्षांपूर्वी कमी होती. ती आता वाढून जवळपास १० करोडच्या जवळपास आहे. त्यामुळे जिल्हा परिषद एवढा मोठा निधी या पुलावर खर्च करण्यासाठी पुढे येत नाही. विशेष म्हणजे मूल तालुका पूर्वी सावली व आताच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येते. आतापर्यंत हे क्षेत्र भाजपाच्याच ताब्यात राहिले. मात्र दुर्दैवाने विकासाचा निधी न मिळाल्याने या परिसराचा विकास झाला नाही. (वार्ताहर)