पावसाळी साहित्याची मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:47+5:302021-06-29T04:19:47+5:30
नंबरप्लेटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष चंद्रपूर : दुचाकीवर नंबरप्लेट लावताना नियमानुसार लावण्याची सक्ती असतानाही अनेक दुचाकीचालक विविध आकाराच्या नंबरप्लेट लावत आहेत. ...
नंबरप्लेटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर : दुचाकीवर नंबरप्लेट लावताना नियमानुसार लावण्याची सक्ती असतानाही अनेक दुचाकीचालक विविध आकाराच्या नंबरप्लेट लावत आहेत. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांचे रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची संख्या कमी आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मजुरी वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये सतत महागाई वाढत आहे. त्या तुलनेत कामगारांच्या मजुरीत वाढ झाली नसल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची संख्या आहे. काही कामगार औद्योगिक क्षेत्रात असले, तरी घरकामासाठी तसेच इतरही ठिकाणी कामगार आहे. मात्र त्यांची मजुरी मागील काही वर्षांमध्ये वाढलीच नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.
पांदण रस्त्यांची कामे करावी
चंद्रपूर : अतिक्रमण व वादविवादाने जिल्ह्यातील पांदण रस्त्यांची कामे खोळंबली. आता पावसाळा असल्याने या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
विजेचा पुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळा असला, तरी उकाडा कायम आहे. त्यामुळे विजेचा पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
आरक्षित जागेवर दुसऱ्यांचाच कब्जा
चंद्रपूर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना बसण्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. मात्र एस.टी. बसमध्ये महिला बसण्यासाठी असलेल्या आरक्षणाचाचा लाभ पुरुषच घेत असल्याने महिलांना अनेकवेळा उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
डास निर्मूलन मोहीम सुरू करावी
चंद्रपूर : मागील आठवड्यापासून समाधानकारक पाऊस झाला. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून, किंचीत तापमानातही वाढ झाली आहे. परिणामी डासांचा उपद्रव वाढला आहे. महानगरपालिकेने शहरात डास निर्मूलन मोहीम सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे, झोपडपट्टी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली.
नवीन वस्त्यांमध्ये वीजखांब नाही
चंद्रपूर : येथील नवीन वस्त्यांमध्ये पथदिव्यांची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही वीज खांब लावण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून या समस्येबाबत पाठपुरावा करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत वीज खांब लावण्यात आले नाही. महानगरपालिकेने नवीन वस्त्यांमध्ये पथदिवे लावावेत, अशी मागणी होत आहे.
वाहनांमुळे नागरिकांना अडचण
चंद्रपूर : येथील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने ठेवण्यात येतात. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या कोरोनामुळे बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेकजण बाजारात गर्दी करीत आहेत. परिणामी नागरिकांना रहदारी करण्यास अडचण जात आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
स्मशानभूमी परिसरातील पथदिवे बंद
चंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरातील स्मशानभूमी परिसरात पथदिवे बंद रहात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने पथदिवे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नाल्यांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला असून, काही नाल्यांची अद्यापही स्वच्छता मात्र झालेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. मनपा प्रशासनाने याची दखल घेऊन नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वाहतूक पोलिसाची मागणी
चंद्रपूर : रामनगर-दाताळा मार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. सोबतच या रस्त्यावर समोर एमआयडीसी असल्याने तेथील कामगारही याच रस्त्याने जात असतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करून अपघातावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.