पाहार्णीच्या माठाला विदर्भात मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:37 PM2018-04-08T23:37:07+5:302018-04-08T23:37:07+5:30
विज्ञानाच्या युगात लोकांचे जीवन जगण्याचे तंत्र बदलले आहे. या तंत्राला आधुनिक साहित्याची जोड मिळाल्याने परंपरागत कुंभार व्यवसाय देशोधडीला लागला आहे. थंड पाण्यासाठी सर्वत्र फ्रिज, वॉटर कुलरचा वापर केला जात असतानाही पाहार्णीच्या माठांचे सुगिचे दिवस कायम आहे. हे माठ संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असून त्याला प्रचंड मागणी आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : विज्ञानाच्या युगात लोकांचे जीवन जगण्याचे तंत्र बदलले आहे. या तंत्राला आधुनिक साहित्याची जोड मिळाल्याने परंपरागत कुंभार व्यवसाय देशोधडीला लागला आहे. थंड पाण्यासाठी सर्वत्र फ्रिज, वॉटर कुलरचा वापर केला जात असतानाही पाहार्णीच्या माठांचे सुगिचे दिवस कायम आहे. हे माठ संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असून त्याला प्रचंड मागणी आहे.
पाहार्णी हे नागभीड तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. पण मातीच्या भांड्यांमुळे या गावाने विदर्भात आपली ओळख निर्माण केली आहे. या गावात तयार होणारी मातीची भांडी संपूर्ण विदर्भात पोहचत आहे. नागभीडपासून पाहार्णी हे गाव बारा-तेरा किमी अंतरावर आहे. नागभीड तालुक्याचाच विचार केला तर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या गावाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता या गावात तयार होणारी मातीची भांडी संपूर्ण विदर्भात जात असल्याने या गावाच्या नावाभोवती वेगळे वलय निर्माण झाले आहे. पाहार्णी येथील दिलीप मोतीराम गिरवले या व्यक्तीने ओल्या मातीला फिरत्या चाकावर आकार देऊन या गावाचे नाव सर्वदूर पोहचवले आहे. गिरवले हे माती घडविण्याचे काम बाराही महिने अगदी मनापासून करीत असतात. आज दिलीप तयार करीत असलेली मातीची भांडी वर्धा, यवतमाळ, भंडारा, नागपूर, उमरेड, पवनी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पोहचत आहेत. या व्यवसायात आलेल्या जाचक अटींमुळे विविध ठिकाणच्या कुंभार बांधवांनी भांडी तयार करणे बंद केले आहे. हे कुंभार बांधव आता पाहार्णीच्या गिरवले यांनाच आर्डर देतात.