पेट्रोलपंपावरील कामगारांची वीरूगिरी
By admin | Published: July 8, 2015 01:11 AM2015-07-08T01:11:02+5:302015-07-08T01:11:02+5:30
तीन महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या पेट्रोलपंपावरील १५ कामगारांनी मंगळवारी न्यायासाठी चंद्रपुरात वीरूगिरी केली.
चंद्रपूर: तीन महिन्यापूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या पेट्रोलपंपावरील १५ कामगारांनी मंगळवारी न्यायासाठी चंद्रपुरात वीरूगिरी केली. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयामागील बीएसएनएलच्या टॉवरवर हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने या विषयात कोणतीही मदत करण्यासाठी असमर्थता दर्शविल्याने कामगारांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अॅड. हर्षल चिपळूणकर यांच्या आवाहनानंतर कामगार टॉवरखाली उतरले. हे आंदोलन तब्बल नऊ तास सुरू होते.
चंद्रपूर शहरातील विविध पेट्रोलपंपावर कार्यरत कामगारांना नियमानुसार किमान वेतन व सर्व सुविधा देण्याची मागणी करणाऱ्या १८ कामगारांना पेट्रोलपंप संचालकांनी तीन महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकले होते. दरम्यान या कामगारांनी विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. त्यानंतर चंद्रपूरचे सहाय्यक कामगार आयुक्त व नागपूर येथील कामगार आयुक्त यांच्यासोबत पेट्रोलपंप संचालक व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चाही झाली. मात्र नंतर पेट्रोलपंप संचालकांनी कामगारांना कामावर घेण्यापूर्वी काही अटी टाकल्या. तसे लिहून देण्यासाठी कामगारांवर दबावही टाकला. मात्र कामगारांनी सदर अटी मान्य न करता न्यायासाठीची लढाई सुरूच ठेवली.
दरम्यान, स्थानिक वासेकर व जयहिंद पेट्रोलपंपवरील कामगार वतन मेश्राम, गौतम जोगी, सचिन टिकले, अरविंद भागडकर, शंकर पोईनकर, रमेश वाढई, दीपक बेंदरे, मनीष पारशिवे, बंडू रामटेके, अरुण साव, प्रशांत रामटेके, राकेश धानोरकर, सचिन मंत्रीवार, नरेश काटोले हे मंगळवारी पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयामागील बीएसएनएलच्या टॉवरवर चढले. या आंदोलनाची माहिती मिळताच, टॉवरखाली पोलीस तैनात करण्यात आले. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी आडे व तहसीलदार अरूण शिंदे यांना या समस्येतून मार्ग काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. त्यानुसार या अधिकाऱ्यांची कामगार नेत्या अॅड.हर्षल चिपळूणकर व कामगार प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली. मात्र पेट्रोलपंपावर कार्यरत कामगारांना न्याय देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असे सांगून या अधिकाऱ्यांनी हात वर केले. त्यानंतर अॅड. चिपळूणकर यांच्या आवाहनावरून हे कामगार दुपारी टॉवरवरून खाली उतरले. (प्रतिनिधी)
समस्येबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप
या आंदोलनानंतर अॅड.हर्षल चिपळूनकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गरीब कामगारांचा कुणी वाली नसून कामगार विभाग पेट्रोलपंप संचालकांच्या हिताचे रक्षण करण्यात गुंतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परिणामी कामगार संकटात सापडले असल्याचे त्या म्हणाल्या.