मागणी वाढली, रक्तादाते घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:49 PM2019-04-22T22:49:49+5:302019-04-22T22:50:18+5:30
मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. तसेच या दिवसांमध्ये अपघातासह इतर आजारांमध्येही वाढ होत असून रुग्णांलयात रक्ताची मागणी वाढते. मात्र त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उन्हाळ्यामध्ये स्वेच्छीक रक्तदान करणाऱ्यांची तसेच शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळे रुग्णांना रक्त देताना वैद्यकीय अधिकाºयांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
औद्योगिक शहर असल्याने अपघाताची संख्या अधिक असते. रक्त हे जीवन आहे. एखाद्या रूग्णाला तातडीने रक्ताची गरज असेल आणि ते मिळाले नाही, तर त्यांच्या जिवाचेही बरेवाईट होऊ शकते. जिल्हा सामान्य रूग्णालयात केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर लगतच्या परराज्यासह इतर जिल्ह्यातूनही रूग्ण येतात. साहजिकच येथे बाराही महिने रक्ताची मोठी गरज भासते. अपघातातील जखमी, सिझेरियन प्रस्तुती इतर शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना रक्ताची गरज भासते. यासाठी गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते.
उन्हाळ्यात दरवर्षी रक्ताची कमतरता असते. यावर्षी रक्तपेढीत सर्वच गटांच्या रक्ताची कमतरता आहे. विशेष म्हणजे, एखादे रक्तदान शिबिर आयोजित केल्यास ही कमतरता भरून निघते. अनेकवेळा रक्तपेढीत रक्त मिळत नसल्याने नाईलाजाने रूग्णांना खासगी रक्तपेढ्यामधून रक्त विकत घ्यावे लागते. खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. दरवर्षी एप्रिल ते जुलै महिन्यात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऐच्छिक रक्तदान शिबिरे व्हावी
मार्च ते जून महिन्यामध्ये वाढते तापमान व शाळा महाविद्यालयामध्ये परीक्षा, उन्हाळी, सुट्या असतात. त्यामुळे स्वेच्छिक रक्तदान शिबिरे कमी होतात. परिणाणी रक्ताची कमतरता भासते. त्या अनुषंगाने रूग्णसेवेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटनांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून मोठे सहकार्य केले आहे. यानंतरही या संघटना रक्तदान शिबिरांसाठी सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्ताची मागणी वाढते त्या तुलनेमध्ये रक्तदात्यांची संख्या कमी होते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्यास ही समस्या दूर होऊ शकते. यासाठी शासकीय ब्लड बँक सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
- डॉ. अमित प्रेमचंद
जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी, चंद्रपूर