कोळसा खाण कामगारांच्या मागण्या मान्य
By Admin | Published: July 14, 2016 12:59 AM2016-07-14T00:59:55+5:302016-07-14T00:59:55+5:30
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील कामगारांनी केलेल्या जोरदार आंदोलनामुळे अखेर व्यवस्थापन नमले असून कामगारांच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या.
व्यवस्थापनाकडून दखल : संपाचा दिला होता इशारा
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील कामगारांनी केलेल्या जोरदार आंदोलनामुळे अखेर व्यवस्थापन नमले असून कामगारांच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. गेल्या दोन महिन्यांपासून बीएमएस वगळता अन्य चार कामगार संघटनांच्या संयुक्त संघर्ष समितीने अनेक आंदोलने करीत कोळसा खाण बंद करुन संप पुकारण्याची घोषणा केली होती. १२ जुलैला क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयापुढे झालेल्या मोर्चा व जाहीर सभेनंतर व्यवस्थापनाने संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलावून तोडगा काढला.
या आंदोलनाचे नेतृत्त्व संघर्ष समितीचे अध्यक्ष आर. शंकरदास, इंटकचे सुदर्शन डोहे, आयटकचे के.एस. रेड्डी, आर.एन. झुपाका, दिलीप कनकुलवार, मधुकर ठाकरे, एचएमएसचे अशोक चिवंडे, संग्रामसिंह, सिटूचे गणपत कुडे, पी.ओ. जॉन आणि प्यारेलाल पुंडे, नागेश मेदर, डी.के. गायधने, आर. आर. यादव आदी अनेक नेत्यांनी केले. संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला होता, हे विशेष. (वार्ताहर)