जिल्ह्यात उद्योगांचे राक्षसी प्रदूषण

By admin | Published: June 6, 2017 12:29 AM2017-06-06T00:29:08+5:302017-06-06T00:29:08+5:30

प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Demonic pollution of industries in the district | जिल्ह्यात उद्योगांचे राक्षसी प्रदूषण

जिल्ह्यात उद्योगांचे राक्षसी प्रदूषण

Next

तब्बल सातशे उद्योग  ओकताहेत धूर जीवघेण्या प्रदूषणाने घेतला अनेकांचा बळी दीडशे उद्योग   डेंजर झोनमध्ये
रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी प्रदूषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे हकनाक बळी जात आहे. जिल्ह्यातील हे जीवघेणे प्रदूषण शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी नवे नाही. सर्वच प्रदूषणाची भयावह स्थिती जाणून आहेत. मात्र ते नियंत्रणात आणणारी एकही प्रभावी उपाययोजना शासन-प्रशासनाला अद्याप गवसली नाही. आजही जिल्ह्यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकताहेत. यातील १५० उद्योग तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेत सर्वाधिक प्रदूषण करणारे आहेत.
चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. प्राचिन इतिहासाच्या खुणा आजही या भूमीत दिमाखाने उभ्या आहेत. गोंडराजाच्या राजवटीत या शहराची उभारणी झाली. शहरातून वाहनाऱ्या इरई आणि झरपट या नद्यांमुळे चंद्रपूर आणखी सुंदर आणि संपन्नतेने नटले. कालांतराने या भूमीत विपुल खनिज संपत्ती असल्याचे आढळून आले आणि तिथूनच उद्योगांचा पसारा वाढत गेला.
चंद्रपूर शहराला लागून व जिल्ह्यातील राजुरा, घुग्घुस, दुर्गापूर, भद्रावती, वरोरा या परिसरातील जमिनीत कोळसा असल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी कोळसा उद्योग उभे झालेत. कोळसा मुबलक असल्याने पॉवर प्लांटसारख्या उद्योगांनाही चालना मिळाली.
चंद्रपुरातील ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र उभारण्यात आले. आज हे केंद्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज केंद्र असून यातून २९२० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. या उद्योगापाठोपाठच स्टिल प्लांट, पेपर मील, विविध सिमेंट कंपन्या, आयुध निर्माणी कारखाना या मोठ्या उद्योगांसह शेकडो लहानमोठे उद्योग जिल्ह्यात आज उभे ठाकले आहेत.
उल्लेखनीय असे की उद्योगांनी सामाजिक स्थिती व आरोग्य यांना बाधा पोहचू नये, यासाठी अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उद्योगांमधून प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे. मात्र दोन्ही हाताने पैसे कमावण्याच्या नादात जिल्ह्यातील उद्योगांनी अनेक नियम पायदळी तुडविले.
याचा परिपाक असा झाला की एकेकाळी विपुल वनसंपदेने नटलेल्या या जिल्ह्यातील प्राणवायूच आता नागरिकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. जिल्ह्यातील प्रदूषण मागील काही वर्षात एवढ्या झपाट्याने वाढत गेले की चंद्रपूर देशातील चवथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. आज हे प्रदूषण नागरिकांचा बळी घेऊ लागले आहे.
जिल्ह्यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकत आहेत. यातील १५० उद्योग तर प्रदूषणाचे राक्षसच ठरले आहे. तरीही शासकीय यंत्रणेत आनंदी आनंदच आहे.

क्रांती उद्योगांची की आजारांची ?
चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाली, असे सर्वत्र बोलले जाते. मात्र याच उद्योगांमुळे आज विविध आजारांनीही क्रांती केल्याचे दिसून येते. एकापाठोपाठ एक अस्तित्वात आलेल्या उद्योगांमुळे अनेकांना रोजगार मिळाला. एवढ्यापुरते समाधान जिल्हावासीयांना लाभले. त्यानंतर याच उद्योगांनी नागरिकांच्या आरोग्याची, पर्यायाने आयुष्याचीच माती केली. दमा, अस्थमा, कर्करोग, ह्दयरोग यासारखे दुर्धर आजार नागरिकांच्या माथी मारले. उद्योगातील प्रदूषणावर आळा बसविणारे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय चंद्रपुरात आहे. मात्र हे कार्यालय आणि तेथील यंत्रणा पांढरा हत्ती ठरले आहे. नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करण्यापलिकडे मंडळाने फारसे काही केले आहे

अनेकांचा मृत्यू
जिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अ‍ॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारख्या आजारांमुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. याच प्रदूषणामुळे अनेकजण आजही मृत्यूशी झुंज देत असून लाखो रुपये त्यांच्यावरील उपचारात खर्च होत आहे.
जलप्रदूषणही गंभीर
जिल्ह्यातून वर्धा, इरई, उमा, झरपट, पैनगंगा या नद्या वाहतात. मात्र वेकोलिच्या कोळसा खाणी, रासायन तयार करणारे कारखाने, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमुळे यातील इरई आणि वर्धा नदीही प्रदूषित झाली आहे. झरपट नदीचे तर अस्तित्वच संपावे, अशी तिची अवस्था झाली आहे. कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे.

असे आहेत प्रदूषित उद्योगांचे आकडे
जिल्ह्यात एकूण ७५० उद्योग आहेत. यात ५० उद्योग मोठे, १० मध्यम तर उर्वरित उद्योग लहान आहेत. यातील १५० उद्योग अतिशय प्रदूषणकारी असल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड कॅटेगरीत टाकले आहे. २०० उद्योग थोडे कमी प्रदूषण करणारे म्हणजेच आॅरेंज कॅटेगरी, ३५० उद्योग ग्रिन कॅटेगरी आणि ५० उद्योगातून फारच कमी प्रदूषण होत आहे.

Web Title: Demonic pollution of industries in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.