पळसगावात रुंद वरंभा सरी पद्धतीने पीक पेरणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:44+5:302021-06-16T04:37:44+5:30
शेतकऱ्यांना लाभदायक पद्धत बल्लारपूर : तालुक्यातील दहेली व पळसगाव या गावामध्ये कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकाचे रुंद वरंभा सरी ...
शेतकऱ्यांना लाभदायक पद्धत
बल्लारपूर : तालुक्यातील दहेली व पळसगाव या गावामध्ये कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकाचे रुंद वरंभा सरी (बीबीएफ)पद्धतीने पहिल्यांदाच शेतकरी ऋषीदेव वासाडे यांच्या शेतात सोयाबीन पीक पेरणीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
खरीप हंगामात बल्लारपूर तालुक्यात जवळपास ३५० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. खरीप हंगाम सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची घाई सुरु झाली आहे. या हंगामाचे पहिले प्रात्यक्षिक, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगावचे कृषी सहाय्यक श्रीकांत ठवरे, कृषी पर्यवेक्षक उमाकांत बोधे, बामणीचे कृषी सहाय्यक राहुल अहिरराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ मशीनद्वारे पेरणी कशी केली जाते, यावर मार्गदर्शन केले. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे एकरी बियाण्यात बचत होते. पिकामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळते राहतो. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. सरीमधून अतिरिक्त झालेले पावसाचे पाणी निघून जाते. एकंदरीत पीक उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात २० टक्क्यापर्यंत वाढ होते, अशी माहिती दिली. बल्लारपूर तालुक्यात बीबीएफच्या चार मशीन आहेत. हे यंत्र एका दिवसात आठ एकरावर पेरणी करते.
कोट
शास्वत उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रुंद वरंभा सरी पद्धतीनेच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, तसेच बियाणाची शास्त्रीय पद्धतीने उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये. अडचणी आल्यास कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.