वेकोलि कामगार संघटनांचे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:37 AM2019-08-03T00:37:52+5:302019-08-03T00:38:29+5:30
राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, गोवरी कोळसा खाणीत भारतीय कोयला खदान मजदूर संघ, संयुक्त खदान मजदूर संघ व हिंद मजदूर सभा या कामगार संघटनांनी द्वारसभा घेऊन कोल इंडियाचे खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, पोवनी, गोवरी कोळसा खाणीत भारतीय कोयला खदान मजदूर संघ, संयुक्त खदान मजदूर संघ व हिंद मजदूर सभा या कामगार संघटनांनी द्वारसभा घेऊन कोल इंडियाचे खासगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविला. यावेळी कामगार नेत्यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.
सास्ती खाणीमध्ये झालेल्या द्वारसभेत भामसंचे केंद्रिय महामंत्री सुधीर घुरडे, वर्धा व्हॅली अध्यक्ष जोगेंद्र यादव, आयटकचे क्षेत्रीय सचिव रायलिंगू झुपाका, उपक्षेत्राचे अध्यक्ष रवी डाहूले, दिनेश जावरे, उल्हास खुणे, एचएमएसचे क्षेत्रिय अध्यक्ष अशोक चिवंडे, सचिव गणेश नाथे यांच्यासह क्षेत्रिय कामगार संघटनांचे अनेक नेते या सभेला उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधीर घुरडे म्हणाले, सरकार बहुमत असल्याने सार्वजनिक उद्योगातील कामगारांच्या हिताचे ४४ कायदे बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे कामगारांवर अन्याय होणार असुन त्याचा तीव्र विरोध करुन याविरुध्द होणाऱ्या संघर्षात कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. भर पावसात झालेल्या या सभेचे संचालन दिनेश जावरे यांनी केले. यावेळी कामगारांनी सरकार व व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. सभेला अनिल निब्रड, शांताराम वांढरे, मारोती नन्नावरे, पांडुरंग नंदूरकर, दिवाकर जनबंधू, मार्कंडी उरकुडे, प्रेमानंद पाटील, भास्कर कायरकर, बंडू मेश्राम, उमेश रामटेके, तिरुपती सातूर,अमोल ताजणे यांच्यासह मोठया संख्येने कामगार उपस्थित होते.