तारसा (खुर्द) गावात डेंग्यू व तापाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:48+5:302021-08-27T04:30:48+5:30
९० टक्के गावकरी आजारी : नाले गटारे तुडुंब भरून गोंडपिपरी : तालुक्यातील मौजा तारसा खुर्द येथे गेल्या पंधराहून अधिक ...
९० टक्के गावकरी आजारी : नाले गटारे तुडुंब भरून
गोंडपिपरी : तालुक्यातील मौजा तारसा खुर्द येथे गेल्या पंधराहून अधिक दिवसांपासून डेंग्यू सदृश ताप व साथीच्या रोगाने थैमान घातल्याने गावातील ९० टक्के लोक आजारी पडले आहेत. याच गावात डेंग्यू तापाचे दोन बळी गेले असून अन्य लोकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये आरोग्य प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तारसा खुर्द व तारसा ( बु.) अशी दोन गावे मिळून तारसा ग्रामपंचायत अधीनस्थ गट ग्रामपंचायत अंतर्गत दोन्ही गावांच्या विकासाचा बोजवारा आहे. गेल्या पंधरवड्यात ऊन व अवकाळी पाऊस असा वारंवार वातावरणात होणाऱ्या बदलामुळे संपूर्ण तालुक्यात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. तारसा (खुर्द ) गावात त्याचा उद्रेक होऊन ९० टक्के लोक विविध आजाराने ग्रासले असल्याचे लोकमतने दिलेल्या गाव भेटी दरम्यान दिसून आले. यावेळी ग्रामस्थांनी गावात पडलेले नालीचे सांडपाणी, तुडुंब भरलेल्या नाल्या, विहिरीतील पिण्याचे पाणी, तसेच महिन्यातून केवळ दोन ते तीनदा नळांना पाणी येत असल्याचे सांगितले. व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
बॉक्स
पाणी साचलेले
प्रभाग क्रमांक तीनच्या ग्रामपंचायत सदस्य विद्या चांदेकर यांच्या घरापासून ते इतर काही नागरिकांच्या घरासमोर प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साचून असून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच पाणी साचलेल्या खड्ड्यामध्ये डासांची पैदास होऊन रोगराईचे प्रमाण वाढले असून एका बिअर बार मालकाने सांडपाणी नाली हेतूपुरस्सरपणे बुजविल्याने सांडपाणी रोखल्याचा आरोप ग्रा.पं सदस्य विद्या चांदेकर यांनी केला आहे.
कोट
फेब्रुवारी महिन्यात आम्ही सत्तेवर आलो. गत दहा ते बारा वर्षांपासून मागील ग्रामपंचायत कमिटीने नाल्यांचा उपसा न केल्याने सर्वत्र घाण साचून आहे. या कामासाठी प्राप्त १५ व्या वित्त आयोग निधीतून खर्च करण्याचा प्रस्ताव पाठविला असता त्याला मंजुरी मिळाली नाही. तसेच सामान्य फंडात काही प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने अत्यावश्यक ठिकाणी नाल्या गटारे साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- अजय नागोराम भोयर, सरपंच,