कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:00 AM2020-08-25T05:00:00+5:302020-08-25T05:00:40+5:30

डेंग्यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. डेंग्यू ताप (डीएफ) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डीएचएफ) हा डेंग्यू विषाणू १, २, ३ व ४ पासून होतो. या दोनही तापात सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. हा आजार कोणाही व्यक्तीला होवू शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो.

Dengue bites 128 people in Corona crisis | कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख

कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वेक्षणासाठी अपुरे मनुष्यबळ : चंद्रपूर मनपा क्षेत्रातही आढळले २४ रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये आरोग्यबाबत जागृती वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १२८ व्यक्तींना डेंग्यू झाल्याचे पुढे आले. यामध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २४ रूग्णांचाही समावेश आहे.
डेंग्यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. डेंग्यू ताप (डीएफ) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डीएचएफ) हा डेंग्यू विषाणू १, २, ३ व ४ पासून होतो. या दोनही तापात सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. हा आजार कोणाही व्यक्तीला होवू शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. अनियंत्रित लोकसंख्या वाढ, अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण, कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचे सदोष व्यवस्थापन, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि अनियमित पाणीपुरवठा, ग्रामीण, आदिवासी भागातील पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप व जीवनशैलीतील बदलांंमुळे या आजाराची बाधा होते. मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित ‘एडिस ईजिप्टाय’ डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावतो. या तापाचा प्रसार मानव-डास-मानव अशा क्रमाने असतो. या डासांची उत्पत्ती घर व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासाने चावा घेतल्यानंतर लक्षणे ५ ते ६ दिवसांच्या काळात दिसून येतात, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.

अशी घ्यावी खबरदारी
लक्षणे आढळल्यास रूग्णाने विश्रांती घ्यावी, रूग्णाचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहण्यासाठी डॉक्टरांना दाखवावे. उलटी, जुलाब, मळमळ व घाम आल्यास शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्या फळांचा रस व ओआरएस द्रावण द्यावे. शरीरात जास्त प्रमाणात पातळ द्रव जातील याची काळजी घ्यावी.

गोंडपिपरीत सर्वाधिक रूग्ण
गोंडपिपरी व राजुरा तालुक्यात डेंग्यू आजाराचे सर्वाधिक रूग्ण आढळले. आरोग्य विभागाच्या तपासणीनुसार गोंडपिपरी २४ आणि राजुरा तालुक्यात आतापर्यंत १५ रूग्ण आढळल्याची नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याने रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता पुन्हा वाढू शकते.

डेंग्यूची सामान्य लक्षणे
डेंग्यूची लक्षणे इतर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधे व डोळे दुखतात. भूक मंदावणे, मळमळणे व पोट दुखते. रक्तस्त्रावीत डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरूवात तीव्र तापाने होते. काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात. क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान हातपाय, चेहरा व मानावर आलेल्या पुरळांवरून केली जाते.

तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ रूग्णालयात जावे. आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षण व रूग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, रूग्णांना औषधोपचार सुरू असताना त्यांचे जेवण व पाणी सेवनाकडे कुटुंबाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
- डॉ. अनिल कुकुडपवार,
जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूर

आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. भांड्यांना योग्य पद्धतीने झाकून लावावे. घराभोवतालची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. घर व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेऊ नये. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस न चुकता पूर्ण करावा.
- डॉ. आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी, मनपा चंद्रपूर

Web Title: Dengue bites 128 people in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.