राळापेठमध्ये डेंग्यूसदृश तापाचे थैमान
By admin | Published: May 22, 2014 11:46 PM2014-05-22T23:46:20+5:302014-05-22T23:46:20+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूसदृश तापाने कहर केला आहे. त्यातच गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात या तापाचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मागील वीस
गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूसदृश तापाने कहर केला आहे. त्यातच गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यात या तापाचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मागील वीस दिवसांत गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ गावातील दोन रुग्णांचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. तापाने फणफणणार्या याच गावातील एका रुग्णाचा मंगळवारी रात्री चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटलमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील राळापेठ गावाला सध्या डेंग्यूसदृश तापाने ग्रासले आहे. मागील दीड महिन्यापासून या तापाची साथ गावात सुरु असल्याने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. राळापेठ गावातील पन्नासहून अधिक रुग्ण वीस दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. यापैकी बर्याच रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्याने अनेकांना चंद्रपूर व गडचिरोलीत रेफर करण्यात आले. यानंतरही राळापेठ गावातील आरोग्य स्थिती काही सुधारली नाही. उलट परिस्थिती वाढण्यावरच जोर असल्याने आरोग्य विभागही आता चक्रावले आहे. राळापेठ येथे मागील वीस दिवसात डेंग्यूसदृश तापाने गावातीलच दोघांचा मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वी विनोद तिमांडे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच राळापेठ गावातील एका बंगाली समुदायातील व्यक्तीचा याच साथीमुळे मृत्यू झाला होता. वरील दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनही कळले नसून, यांच्या मृत्यूचे कारण संदिग्ध असल्याचे बोलले जात आहे. आरोग्याची ही बाब अजूनपर्यंत स्पष्ट झाली नसताना मंगळवारी रात्री राळापेठ गावातीलच पुन्हा एका रुग्णाचा उपचारादरम्यान चंद्रपुरात मृत्यू झाला. पत्रूजी भगवान ताजणे (५८) असे या रुग्णाचे नाव असून, मागील काही दिवसांपासून हा व्यक्ती तापाने फणफणत होता. चंद्रपुरातील श्वेता हॉस्पिटलमध्ये ताजणे भरती होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची रुग्णालयातून सुट्टी झाली. दरम्यान, पत्रूजी ताजणेला डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ताजने रुग्णालयातून घरी आल्यानंतर परत त्याला ताप आल्याने पुन्हा तो रुग्णालयात भरती झाला. मात्र, मंगळवारी रात्री त्याचा उपचादारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, राळापेठ येथील घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)