अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:39 PM2018-09-21T22:39:32+5:302018-09-21T22:40:15+5:30
शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया आदी संसर्गजन्य रोगांनी थैमान घातले आहे. याला शहरातील अस्वच्छता कारणीभूत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता करावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेच्या वतीने केली असून यासंदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.
शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र अनेक प्रभागात अस्वच्छता आहे. नाल्या तुंडूब भरल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे त्या ठिकाणी डासांचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. याचाच परिणाम लहान मुलां-मुलींना, मोठ्या स्त्री-पुरुषांना डेंग्यु, चिकन गुनिया, मलेरिया, सारख्या रोगांना बळी पडावे लागत आहे. अनेक रुग्ण दागावल्याचीही माहिती आहे. याकडे मनपाने लक्ष देऊन फॉगींग मशीनद्वारे फवारणी करावी, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, शहरात स्वच्छता मोहिम राबवावी, नाल्याचा उपसा करावा, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेसतर्फे आयुक्तांना देण्यात आले.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगरसेवक अशोक नागपूरे, नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक निलेश खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नगरसेवक प्रशांत दानव, स्वप्नील तिवारी, स्नेहल चालखुलकर आदी उपस्थित होते.
रुग्णालये फुल्ल
शहरासह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वायरल फ्ल्यू पसरल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयास शहरातील खासगी रुग्णालय फुल्ल झाली आहेत. चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात खांटाची संख्या कमी आणी रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.