प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी दंगानियंत्रण पथक तैनात
By admin | Published: March 3, 2017 12:51 AM2017-03-03T00:51:38+5:302017-03-03T00:51:38+5:30
स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी
उत्पादन ठप्प : दुसऱ्यादिवशीही आंदोलन सुरुच
माजरी : स्थानिक माजरी येथील पाटाळा, नागलोन, पऴसगाव व माजरी येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नोकरी व मोबदल्याच्या मागणीसाठी पुकारलेले खाण बंद आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. रात्रभर महीला वर्ग कोळसा खदानीतच होत्या. बुधवारी सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाल्याने वेकोलिचे उत्पादन ठप्प पडून कोट्यवधींचा फटका वेकोलिला बसला आहे.
वेकोलि व्यवस्थापनाने आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकासह पाचारण केले आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असतानाही वेकोलि व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्ताची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही व यावर कुठलाही तोडगा काढला नाही. दुसरीकडे जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वत: येऊन दखल घेत नाही व नोकरी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुुरूच राहील, अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. वेकोलि व्यवस्थापनाने आम्हाला मंडप टाकण्यास मनाई केली आहे. काल रात्रभर आम्ही येथेच कोळशावर बसून राहिलो. आज पुन्हा भर उन्हात आंदोलन करीत आहोत, अशी माहिती प्रकल्पग्रस्त लिलेश ठवस व प्रहार संघटनेचे अमोल डुकरे यांनी दिली. त्यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. वेकोलि व्यवस्थापनाने जून २०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहीत करुन शेतकऱ्यांना भूमिहीन केले. त्या बदल्यात तीन महीन्यात प्रकल्पग्रस्ताना नोकरीवर रुजु करु, असे आश्वासन देऊन त्याना प्रशिक्षणसुध्दा दिले. मात्र गेल्या दोन वर्षापासून नोकरी दिली नाही. वेकोलिने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
वेकोलिच्या भूमी अधिग्रहनात ३५० प्रकल्पग्रस्त असून त्यातील १२० प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. या आंदोलनस्थळी दोन दिवसांपासून नवनिर्वाचित जि. प. सदस्य प्रवीण सूर, भाजपाचे नेते उमेश बोडेकर, अंकुश आगलावे, नरेंद्र जीवतोडे, काँग्रेसचे विजय देवतळे, आसावरी देवतळे हे भेट देत असून अधिकारी व प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करीत आहेत. यावेळी वरोऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, माजरीचे ठाणेदार कृष्ण तिवारी, भद्रावतीचे ठाणेदार विलास निकम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या काम बंद आंदोलनात प्रकल्पग्रस्त लिलेश ढवस, संदिप झाडे, रवी उपरे, अंकुश डंभारे, गोकुल डोंगे, किसन ढवस, प्रफुल भुसारी, गजानन पारशिवे, संगीता खापने, माया ढवस, मिराबाई ढवस हे सहकुटुंब सहभागी झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने प्रहारचे संस्थापक व आमदार बच्चु कडू यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे. आ. बच्चू कडू यांनी वरोरा येथील उपविभागीय अधिकारी यांना यांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी न देता प्रकल्प सुरू कसा केला, याविषयी जाब विचारला. यावर भद्रावतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात तात्काळ बैठक बोलावली आहे. (वार्ताहर)