लाख-दीड लाख जमा करा, तरच रुग्णाला एन्ट्री!, चंद्रपूरमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:14 AM2020-09-15T04:14:35+5:302020-09-15T06:53:29+5:30
या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे.
चंद्रपूर : कोरोनाबाधित सौम्य लक्षणे किंवा त्याहून जास्त लक्षणे असणाऱ्या रुग्णालाच आम्ही उपचारार्थ दाखल करून घेऊ, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास किंवा आॅक्सिजनची गरज भासल्यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ घेवून जाणे बंधनकारक राहील, रुग्ण भरती करतानाच दहा दिवसांचे पैसे म्हणजे लाख-दीड लाख रुपये अगोदर जमा करावे लागेल, अशी नियमावलीच शहरातील खासगी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लावल्याने कोरोनाबाधित रुग्ण तथा नातेवाईकांच्या उरात धडकी भरली आहे.
या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. अशातच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुन्हा काही खासगी रुग्णालये कोविड-१९ बाधितांसाठी सक्तीने घेतली आहेत. ज्या खासगी रुग्णालयात बाधितांना दाखल केले जात आहे, त्यांनी कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी सूचना फलक रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर लावला आहे.
दवाखाना कोविड सेंटरसाठी घेतल्यामुळे दवाखान्यातील बरेचशे कर्मचारी काम सोडून गेले. व्हेंटीलेटर, आॅक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य घ्यायला पैसे लागतात. त्यामुळे अॅडव्हान्स पैसे मागितले जाते. शासनाने आधी कर्मचारी पुरवू असे सांगितले. मात्र एकही कर्मचारी दिला नाही. मी स्वत:च रुग्णांकडे लक्ष देत आहे.
- डॉ. प्रकाश मानवटकर,
मानवटकर मल्टिस्पेशालिटी, हॉस्पिटल, चंद्रपूर.
कोविड हॉस्पिटल करताना शासनानेच आम्हाला दर आकारून दिले. त्यानुसार शुल्क घेतले जात आहे. मी स्वत: ५५ वर्षांचा आहे. तरीही सामाजिक कार्य म्हणून कोविड रुग्णासाठी काम करीत आहे.
- डॉ. नरेंद्र कोलते, गुरुकृपा क्लिनिक व नर्सिंग होम, चंद्रपूर.