१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; मागील निवडणुकीच्या तुलनेत संख्या वाढली !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 05:25 PM2024-06-06T17:25:43+5:302024-06-06T17:27:26+5:30
Chandrapur : एकूण मतदानापैकी १६.६ टक्के मतदानाची असते गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या चंद्रपूर लोकसभेचा निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल दोन लाख साठ हजार ४०६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे या दोघांव्यतिरिक्त उर्वरित तेराही उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे.
निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते. जर उमेदवाराने निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, तर हीच अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते. याच स्थितीला उमेदवाराचे 'डिपॉझिट' जप्त होणे, असे संबोधले जाते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ (१६.६ टक्के) मते घेण्यासही अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल १३ जणांची डिपॉझिट जमा झाल्याचे चित्र आहे
कोणाकोणाचे डिपॉझिट जप्त ?
राजेश बेले - २१,९८०
राजेंद्र रामटेके - ९,१८८
अवचित सयाम - १९०६
अशोक राठोड - १६७०
नामदेव शेडमाके - २५५६
पोर्णिमा घोनमोडे - ९७३
वनिता राऊत - १०५७
विकास लसंते - १५२०
विद्यासागर कासर्लावार - १४२६
सेवकदास बरके - १९९८
दिवाकर उराडे - ३२२४
मिलिंद दहिवले - १७६१
संजय गावंडे - १५०८८
मतदारसंघात १५ उमेदवार होते रिंगणात
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजेश बेले, राजेंद्र रामटेके, अवचित सयाम, अशोक राठोड, नामदेव शेडमाके, पौर्णिमा घोनमोडे, वनिता राऊत, विद्यासागर कासर्लावार, सेवकदास बरके, दिवाकर उराडे, विकास लसंते, मिलिंद दहिवले, संजय गावंडे या १५ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते.
निवडणूक लढण्यासाठी डिपॉझिट किती?
■ लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना २५ हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते.
■ अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील उमेदवाराला काही सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते.
■ विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम सामान्य उमेदवारासाठी दहा हजार रुपये आणि एससी-एसटीसाठी पाच हजार रुपये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीसुद्धा उमेदवारांना डिपॉझिट भरावी लागत असते