प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:52 PM2017-12-24T23:52:30+5:302017-12-24T23:52:44+5:30
चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे.
रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे. एकीकडे चंद्रपूर स्वच्छ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जलस्रोत कचऱ्याने बरबटले ठेवणे, ही बाब चंद्रपूरच्या सुदृढ आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारी ठरत आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. जवळजवळ साडेचार लाखांचा आकडा लोकसंख्येने पार केला आहे. हा आलेख आणखी वाढतच जाणार आहे. असे असताना चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी सध्या एकमेव इरई धरण हेच जलस्रोत उपलब्ध आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला.
त्यामुळे चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारे हे एकमेव जलस्रोतही सध्या अखेरची घटका मोजत आहे. या धरणात केवळ ३९ टक्के पाणी असल्याने यंदाचा उन्हाळा चंद्रपूरकरांच्या तोंडचे पाणी पळविणारा ठरणार आहे.
सध्या मनपा प्रशासन चंद्रपूरकरांची तहान भागवू शकणाºया दुसऱ्या जलस्रोताच्या शोधात आहे. मात्र जे जलस्रोत प्राचिन काळापासून अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोंडराजाच्या राजवटीत चंद्रपुरात अनेक मोठमोठ्या विहिरी बांधल्या आहेत. ब्रिटीश सरकारनेही काही विहिरी बांधल्या. त्या आजही आपल्या पोटात बाराही महिने पाणी साठवून अस्तित्वात आहेत.
महाकाली मंदिरामागे दोन विहिरी, नगिनाबाग येथील सवारी बंगाल्याजवळ एक विहीर, जटपुरा गेट हनुमान मंदिराजवळ एक विहीर, यासोबतच अंचलेश्वर मंदिर, जिल्हा कारागृह, भिवापूर येथील बंगाली कॅम्प या परिसरातही मोठमोठ्या प्राचीन विहिरी आहेत. तब्बल १५ ते १७ एमएलडी पाणी या विहिरींमधून चंद्रपूरकरांना मिळू शकते. मात्र या विहिरींकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या विहिरी पाण्यासोबत मनपाच्या उदासीनतेची घाणही आपल्या पोटात बाळगून आहे.
सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान धडाक्यात राबविणे सुरू आहे. शहर स्वच्छतेसाठी एकावर एक पावले उचलली जात आहे. मनपाच्या या प्रयत्नांचे फलितही दृष्टीस पडत आहे, यात शंका नाही. मात्र शहर स्वच्छ करताना जलस्रोत तसेच उपेक्षित आणि घाणीने बरबटलेले ठेवणे योग्य नाही. मनपाच्या या कृत्यामुळे मनपाचेच स्वच्छता अभियान डागाळले जात आहे.
शेकडो विहिरी बंद
आगामी उन्हाळा चंद्रपूरकरांसाठी भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे. चंद्रपूर मनपाच्या हद्दीत सुमारे सव्वा पाचशे विहिरी आहेत. यातील केवळ १३२ विहिरीच सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यातीलही ८० हून अधिक विहिरींचे पाणी दूषित असल्याची माहिती आहे. शहरातील प्राचिन विहिरींसोबतच इतर विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छ केल्या तर पाण्याची पातळी वाढून त्याचा लाभ निश्चितच चंद्रपूरकरांना मिळणार आहे.
सामाजिक संस्थांच्याही पुढाकाराची गरज
चंद्रपुरातील या प्राचिन विहिरींना स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि जलस्रोत बघता मनपा प्रशासनाला हे प्राचिन जलस्रोत स्वच्छ आणि अबाधित ठेवावेच लागणार आहे. इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व त्यांच्या चमूने सलग शेकडो दिवस श्रमदान करून चंद्रपुरातील प्राचिन वास्तू व परकोट स्वच्छ केला. या प्राचिन जलस्रोतांच्याही स्वच्छतेसाठी शहरातील सामाजिक संस्थांनी असाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्यथा आंदोलन
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे राजेश बेले यांनी या प्राचिन विहिरींची पाहणी केल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. शहराच्या पोटात असलेले हे प्राचिन जलस्रोत असे दूषित होत असल्याने त्यांनी ‘लोकमत’जवळ चिंता व्यक्त केली. मनपाने या विहिरींना स्वच्छ करून नवसंजीवनी द्यावी, अन्यथा संजीवनी संस्था या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा राजेश बेले यांनी दिला. यानंतरही मनपाने दखल घेतली नाही तर पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.