औद्योगिक शहरात युवक क्रीडा संकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:26 AM2021-04-14T04:26:00+5:302021-04-14T04:26:00+5:30

लखमापूर : तालुक्यातील मध्य ठिकाण व सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून गडचांदूरला ओळखले जाते. या शहराची लोकसंख्या जास्त असल्याने क्रीडाप्रेमी ...

Deprived of youth sports complexes in industrial cities | औद्योगिक शहरात युवक क्रीडा संकुलापासून वंचित

औद्योगिक शहरात युवक क्रीडा संकुलापासून वंचित

googlenewsNext

लखमापूर : तालुक्यातील मध्य ठिकाण व सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून गडचांदूरला ओळखले जाते. या शहराची लोकसंख्या जास्त असल्याने क्रीडाप्रेमी जास्त आहेत; परंतु या क्रीडाप्रेमींना योग्य सराव करण्यासाठी एक सुसज्ज क्रीडा संकुल नसल्याने युवकामधे संताप व्यक्त केला जात आहे.

जिवती येथे तात्काळ ग्रामीण रुग्णालय सुरू करा

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोना या महामारीमुळे जिवती या अतिदुर्गम भागात जनता भयभीत आहे. जिवती तालुका निर्माण होऊन अकरा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेलेला आहे. तालुका तिथे ग्रामीण रुग्णालय हे शासनाचे धोरण असतानाही केवळ जिवती हा विदर्भातील मागास व कुपोषणग्रस्त तालुका असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून सुरू केले नाही. आता सध्याच्या कोरोना काळात तातडीने ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

व्यावसायिकांचे रस्त्यावर अतिक्रमण

चंद्रपूर : चंद्रपूर- नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत काही व्यावसायिक नव्या दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांना विक्रीसाठी रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रस्ता मोठा असूनही अनेक वेळा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

जनावरांमुळे नागरिकांना त्रास

चंद्रपूर : चंद्रपूर- नागपूर महामार्गावर तसेच तुकूम, पठाणपुरा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असतात. अनेक वेळा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध बसातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.

एटीएमची सुरक्षा रामभरोसे

चंद्रपूर : शहरातील काही एटीएम केंद्रामध्ये सुरक्षारक्षक नाहीत. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये प्रत्येक एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील बहुतांश एटीएममध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

धूळ प्रदूषणाला आळा घालावा

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच धूळ उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, वेळीच रस्ता दुरुस्त केला जात नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर होत आहे.

बाबूपेठ परिसरात पाणीटंचाई

चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमित नळ सोडून येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

दाताळा परिसरात शेणखताचे ढीग

चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या दाताळा गावपरिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेलाच शेणखताचे ढीग असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला असल्याचे दिसून येते.

पेठगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

सावली : तालुक्यातील उपरी ते भान्सी-पेठगाव रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त

मूल : येथील विश्रामगृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराटपणे वाहन चालवत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अनुदान रखडल्याने शेतकऱ्यांची कोंडी

वरोरा : तालुक्यात धडक सिंचन विहीर योजनेची कामे करण्यात आली. विहीर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खरीप हंगामातही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

जांभूळघाट-नवतळा मार्गाची दुरवस्था

चिमूर : तालुक्यातील जांभूळघाट- पिंपळगाव- नवतळा हे आठ कि.मी.चे अंतर आहे. चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडले. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे विविध योजना कागदावरच

सिंदेवाही : पशुधनविकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. पंचायत समितीस्तरावर सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे; पण पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्या, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी

घुग्घूस : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीजजोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेंतर्गत वीजपुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.

तालुक्यातील नाल्यांची स्वच्छता करावी

राजुरा : तालुक्यातील अनेक गावांतील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. काही वॉर्डांत नाल्या बांधण्यात आल्या; पण नियमित स्वच्छता होत नसल्याने बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Deprived of youth sports complexes in industrial cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.