डेरा आंदोलनातील कर्मचाऱ्यांची चौकशी समितीला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:44+5:302021-04-21T04:28:44+5:30
चंदपूर : रुग्णालयात सिझर वाॅर्डमध्ये काम करणारी कक्षसेविका आशा वैद्य यांचे पती किशोर वैद्य (वय ४८)) तसेच ...
चंदपूर : रुग्णालयात सिझर वाॅर्डमध्ये काम करणारी कक्षसेविका आशा वैद्य यांचे पती किशोर वैद्य (वय ४८)) तसेच सफाई कामगार म्हणून कार्यरत भोजराज शेट्टी यांचे वडील गोविंदस्वामी शेट्टी यांचे निधन झाले. उपचाराची गरज असतानाही नऊ महिन्यांपासून पगारच नसल्याने पैशाअभावी सदस्यांवर उपचार करता आले नाही.त्यामुळे त्यांचे निधन झाले असा आरोप करीत संतप्त कामगारांनी मंगळवारी अधिष्ठाता कार्यालयावर धडक दिली.
मागील तीन दिवसांपासून मुंबई येथून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची एक चमू लेखाधिकारी आर. के. चव्हाण यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली. जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात डेरा आंदोलनातील कामगारांनी अधिष्ठाता कार्यालयावर धडक देत चौकशी समितीला घेरले. जोपर्यंत आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये देशमुख यांनी सर्व पुराव्यानिशी चौकशी समितीसमोर अधिष्ठाता कार्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचा बुरखा फाडला. त्यानंतर दुपारी चार वाजता चौकशी समितीचे प्रमुख वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबईचे लेखाधिकारी आर. के. चव्हाण यांना शासकीय विश्रामगृह येथे भेटून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांचे बँक खाते व त्यांच्या नियुक्तीच्या पत्राची प्रत तसेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे देण्यात आले. यावेळी जनविकास कामगार संघाचे सतीश येसांबरे, अमोल घोडमारे व प्रमोद मांगळूरकर उपस्थित होते. थकीत पगाराबाबत लवकर निर्णय न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.