हताश शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर फिरविला नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:49+5:302021-07-01T04:20:49+5:30
: पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही फोटो प्रकाश काळे गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची ...
:
पेरणी करूनही बियाणे उगवलेच नाही
फोटो
प्रकाश काळे
गोवरी : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीनची पेरणी केली. कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाच कशीबशी पेरणी करून शेतकऱ्यांनी उद्याचे स्वप्न बघत पिकांची लागवड केली. मात्र राजुरा तालुक्यातील गोवरी येथील युवा शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील अनुदानित सोयाबीनची पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्याने एक एकरातील सोयाबीन पिकावरच नांगर फिरविल्याचा धक्कादायक प्रकार गोवरी येथे घडला. बोगस बियाणे कंपनीविरुद्ध रोष करण्यात येत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लगबगीने लागवड केली. उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून कशीबशी शेती केली. कोरोना महामारीचे भयानक संकट उभे असतानाही रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस पडल्याने गोवरी येथील शेतकरी नागेश्वर देविदास ठेंगणे यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र त्यानंतर आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी, शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे एक एकरातील बियाणे उगवलेच नाही. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाची पेरणी करूनही उगवण झाली नाही. सोयाबीनची पेरणी करूनही सोयाबीनच्या बियाणाने शेतकऱ्याला दगा दिला. पावसामुळे सोयाबीन उगवले नसेल म्हणून शेतकऱ्याने सोयाबीन उगविण्याची प्रतीक्षा केली. मात्र बियाणे उगवण शक्तीचा कालावधी निघून गेला तरी सोयाबीन उगवले नाही. शेवटी हताश होऊन शेतकरी नागेश्वर ठेंगणे यांनी शेतात पेरलेल्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवून त्याच जागेवर दुसरे पीक घेण्याचा निर्णय घेतला.
बॉक्स
नुकसान भरपाई द्यावी
शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे बियाणे पेरणी करूनही ते उगवले नाही. राजुरा तालुक्यातही हजारो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. सोयाबीनची उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट
माझ्या एक एकर शेतात मी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. पेरणी करूनही सोयाबीन बियाणे बोगस निघाले. त्यामुळे नाईलाजाने शेतातील पेरलेल्या सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.
- नागेश्वर देविदास ठेंगणे
नुकसानग्रस्त शेतकरी, गोवरी.