दुर्धर आजारातही ८० वर्षीय इसमाची दोनदा कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:53+5:302021-05-15T04:26:53+5:30
वरोरा : एक निष्णात कारागीर म्हणून आनंदवनात काम करीत असताना एकदा नव्हे, तर दोनदा कोरोना विषाणूने घेरले. इतर आजार ...
वरोरा
: एक निष्णात कारागीर म्हणून आनंदवनात काम करीत असताना एकदा नव्हे, तर दोनदा कोरोना विषाणूने घेरले. इतर आजार असताना या ८० वर्षीय इसमाने दोन्हीवेळा कोरोनावर मात करीत सुदृढ नागरिकांसमोर आपला आदर्श ठेवला आहे.
कर्मयोगी बाबा आमटे यांनी मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. त्या सहकाऱ्यांमध्ये राजप्पा हदलवार यांचाही समावेश होता. आनंदवनातील स्नेहा सावलीमध्ये ते राहतात. आनंदवनात कुष्ठरोग बांधवांसोबत निरोगी व्यक्ती राहतात. कोरोना विषाणूची भारतात लागण होताच आनंदवन व्यवस्थापन सतर्क झाले. कोरोना विषाणूचा शिरकाव होणार नाही याची काळजी घेतल्या गेली. परंतु आनंदवन परिसरात कोरोनाने प्रवेश केला. राजप्पा हदलवार यांना कोरोनाची लागण झाली. आनंदवन व्यवस्थापनाने राजप्पासह लागण झालेल्यांना वेळीच औषध उपचार व उपाययोजना केल्यानंतर आनंदवनातील राजप्पासह काही जणांनी यावर मात केली. काही महिन्यांचा अवधी झाल्यानंतर राजप्पाला पुन्हा कोरोनाने जखडले. राजप्पा हदलवार यांनी हार मानली नाही. त्यावर मात करीत आपले दैनंदिन जीवन जगत असल्याची माहिती आनंदवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ यांनी दिली.
बाॅक्स
राजप्पा आनंदवनचे स्थापत्य अभियंता
कर्मयोगी बाबा आमटे यांच्यासोबत आनंदवन निर्मितीत मूळचे आंध्र प्रदेशातील असलेले राजप्पा हदलवार यांचे मोठे सहकार्य लाभले. काम बघून कर्मयोगी बाबा राजप्पा यांना आनंदवनचे स्थापत्य अभियंता म्हणत होते. १९९३ मध्ये किल्लारी येथे भूकंपाने उद्ध्वस्त झालेली घरे बांधण्याकरिता डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वात आनंदवनाची चमू पोहोचली. त्यात राजप्पा यांचा समावेश होता. सेवाग्राम येथील डॉ. दिशिकांत यांनी त्यांच्या मुलीचा हात पंचेचाळीस वर्षापूर्वी राजप्पाच्या हातात दिला. तेव्हापासून ही जोडी आनंदवनात आनंदाने नांदत आहे.
कोरोनाची पहिली लाट कमी होत नाही तोच दुसऱ्या लाटेने थैमान घातले. परत राजप्पा यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. राजप्पांची प्राणवायू पातळी कमी झाली. मधुमेह व इतर आजारांमुळे राजप्पांची काळजी वाढली, परंतु दोन्हीवेळी कर्मयोगी बाबांनी दिलेला आत्मविश्वास व जगण्याची ऊर्मी कामी आल्याचे राजप्पा मोठ्या अभिमानाने सांगतात.