शासकीय कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्यांना लोकार्पणाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:38 IST2025-01-08T13:33:37+5:302025-01-08T13:38:44+5:30
जुन्या इमारती धोकादायक : नवीन इमारती बनून तयार पण उद्घाटनाची प्रतीक्षा

Despite the completion of the construction of the government office, it is awaiting its inauguration.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय कार्यालयाला अद्ययावत इमारती मिळाव्या, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु, बहुतांश इमारतीचे काम पूर्ण होऊनही त्यांना लोकार्पणाची प्रतीक्षा लागली आहे. यामध्ये कोरपना तालुक्यातील तालुका वैद्यकीय कार्यालयाची इमारत यासह विविध कार्यालयाचा समावेश आहे.
जिल्ह्यात वनविभाग, महावितरण कंपनी, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसील, आदिवासी विकास प्रकल्प, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आदी कार्यालयांसह अनेक शासकीय कार्यालय आहेत.
यातील काही कार्यालयांच्या इमारती या भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. तर काही शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्यामुळे मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. काही कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकामसुद्धा पूर्ण झाले. यापैकी काही कार्यालये नवीन इमारतीत शिफ्टसुद्धा झाली आहेत.
चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय प्रगतिपथावर
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम बंगाली कॅम्प ते बाबूपेठ मार्गावर सुरू असून ते प्रगति- पथावर आहे.
जुनी कार्यालये धोकादायक इमारतींत
जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये जीर्ण झाली आहेत, त्यामुळे त्या धोकादायक स्थितीत आहेत. काही शाळांतील वर्गखोल्यांचा समावेशही यात आहे. त्याचे निर्लेखन करून नव्या इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे.
अपुऱ्या जागेमुळे नव्या इमारतींसाठी प्रस्ताव
जिल्ह्यातील बहुतांश शासकीय इमारती जीर्ण झाल्या आहेत. तर काही कार्यालयात कामकाजासाठी जागा अपुऱ्या दिसून येतात. त्यामुळे नव्या इमारतींसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. परंतु, निधीअभावी ते प्रस्ताव रखडल्याची माहिती आहे.
उद्घाटनाला मुहूर्त का मिळेना?
जिल्ह्यातील बहुतांश इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश इमारतीचे बाधकाम सुरू
जिल्ह्यातील बहुतांश शासकीय इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निधी आल्यामुळे त्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यात बसस्थानक, शाळेतील वर्गखोल्या आदींचा समावेश आहे