सीझन नसतानाही चंद्रपूरमध्ये आंब्याच्या झाडाला लागले आंबे; जागतिक हवामान बदलाचे संकेत
By साईनाथ कुचनकार | Published: September 22, 2023 06:36 PM2023-09-22T18:36:17+5:302023-09-22T18:36:48+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्याच्या झाडाला मोहोर येऊन आंबे लागतात.
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्याच्या झाडाला मोहोर येऊन आंबे लागतात. मात्र, चंद्रपूर शहरातील गुलमोहोर काॅलनी नगिनाबाग परिसरात एका नागरिकाच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला चक्क पावसाच्या दिवसांमध्ये आंबे लागले आहेत. या दिवसांमध्ये आंबे लागल्यामुळे सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळेच आंबे लागल्याचे आता पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंब्याच्या झाडाला मार्च महिन्यामध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यात हळूहळू आंबे लागतात. मात्र, यावर्षी वातावरणात बराच बदल झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोरडे वातावरण असते. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती होती. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक दिवस पाऊस कोसळलाच नाही. जेव्हा सुरू झाला तेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पुन्हा मोठी विश्रांती घेतली. पावसाचे दिवस असतानाही नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. या वातावरणातील या बदलामुळे सीझन नसताना आंब्याच्या झाडाला आंबे लागल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, २०२३ या वर्षामध्ये जागतिक वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या बदलाचा सूक्ष्म अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. हा बदल भविष्यासाठी चिंताजनकही ठरू शकण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी आमच्या घरच्या आंब्याच्या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे लागायचे. हे झाड आता २० वर्षांचे आहे. मात्र, यावर्षी भर पावसाच्या दिवसांमध्ये आंबे लागले असून ते पक्वही झाले आहेत. वातावरणाच्या बदलामुळेच असे झाले असावे. -कुशाब कायरकर
सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर
२०२३ या वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणात बदल जाणवू लागले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रचंड पाऊस कोसळला. पावसाच्या दिवसांमध्ये कडक ऊन आहे. यासोबत अन्य बदलही जाणवत आहे. जागतिक हवामान बदलाचे हे संकेत आहेत. या संकेताचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. - योगेश दुधपचारे, पर्यावरणतज्ज्ञ, चंद्रपूर