धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:01 PM2018-08-29T23:01:17+5:302018-08-29T23:02:35+5:30

उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण केलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

Despite the water in the dam, water shortage in Chandrapur | धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई

धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई

Next
ठळक मुद्देनागरिकांत संताप : अद्यापही सुरू आहे दिवसाआड पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण केलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असे वाटावे, इतकी गंभीर स्थिती पाणी पुरवठ्याची आहे. मागील दहा वर्षात याच सुधार होऊ शकला नाही. त्यामुळे दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाणी संचय होऊ शकला नाही. त्यामुळे हिवाळ्यात इरई धरणाचा जलसाठा चिंताजनक स्थितीत होता. हिवाळा संपत असताना केवळ ३५ टक्केच जलसाठा धरणात होता. त्यामुळे उन्हाळ्यात चंद्रपूरकरांचे पाण्यासाठी हाल होतील, हे निश्चित होते. ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाऊ लागला.
मात्र यावर्षी पावसाळ्यात बºयापैकी पाऊस पडत आहे. इरई धरणातही ७५ टक्क्याहून अधिक जलसाठा आहे. तरीही महानगरपालिकेने पाणी पुरवठा नियमित केला नाही. पावसाळा संपायला आला तरी चंद्रपूकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना अकारण भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपा केव्हा झोपेतून जागी होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच मनपाच्या या प्रकारामुळे चंद्रपूरकर कमालीचे संतापलेले आहेत.
पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी
पाणीपुरवठाही कमी

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.
अनेक भागात चार-पाच दिवसाआड पाणी
उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असला तरी चंद्रपुरातील बाबुपेठमधील अनेक भागात तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच पठाणपुरा, विठ्ठलमंदिर वॉर्ड, नगिनाबाग आदी भागातही अनियमित पाणी पुरवठा होत आहे.
आता तरी पाईपलाईन बदलवा
चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपुरातील महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे पुढे आणखी शहराच्या सीमा वाढणार आहे. असे असले तरी या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ५० ते ६० वर्ष जुनी आहे. आता ती अत्यंत खिळखिळी झाली असून मनपा प्रशासनानेही ती कालबाह्य झाली असल्याचे मान्य केले आहे. असे असतानाही अद्याप ती बदलविण्यात आलेली नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा ठप्प पडतो. आता तरी ही पाईपलाईन बदलविणे गरजेचे झाले आहे.

इरई धरणाची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या संदर्भात एक बैठक घेऊन चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल.
-अंजली घोटेकर,
महापौर, महानगरपालिका, चंद्रपूर.

Web Title: Despite the water in the dam, water shortage in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.