पाणी असतानाही भिसीवासीयांचा संघर्ष
By admin | Published: November 26, 2015 12:51 AM2015-11-26T00:51:59+5:302015-11-26T00:51:59+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे.
नागरिक मुबलक पाण्याच्या प्रतीक्षेत : तीन पाणी टाक्या केवळ शोभेच्या वास्तू
भिसी : चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. १७ ग्रामपंचायत सदस्य, तीन पाण्याच्या टाकी, सभोवताल पाणी आहे, पण भिसीतील जनता मात्र तहानलेलीच असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे.
आज भिसी येथे सहा वार्ड असून तीन पाण्याच्या टाकी उभारण्यात आल्या आहेत. डोंगर्ला, मसनखुटी, टागोरकाटा व धापला तलाव अशा ठिकाणावरुन पाणी पुरवठा होतो. वार्ड क्र. १, २, ३ व ४ ला पाणी पुरवठा करणारी नळ योजनेची पाईप लाईन माजी सरपंच स्व. भगवानजी रेवतकर यांच्या काळातील पंचविस वर्षे पुर्वीची आहे. मेनरोडला मुख्य पाईपलाईन असल्यामुळे आणि नेहमी पाईपामध्ये दोष निर्माण होत असल्याने खोदकाम करावे लागते. त्यातच पाईप लाईन जीर्ण झाल्याने पाणी विनाकारण विसर्ग होऊन नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते.
नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर खोदकाम होत असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी गावातील राजकारणाचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. हा प्रश्न असला तरी चिंतनाचा विषय बनला आहे.
२५ वर्र्षापूर्वी पाईपलाईन टाकणाऱ्या ठेकेदाराला दोष देण्यात अर्थ नाही. त्यांच्यामुळेच आजपर्यंत नागरिकांना पाणी मिळाले आणि मिळत आहे हे सत्य विसरता येत नाही. मात्र सध्या आजचा विचार व कृती महत्त्वाची असून ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येवून जनतेला मूबलक पाणी मिळवून द्यावे, अशी आर्त मागणी भिसीवासी नागरिकांची आहे. (वार्ताहर)