नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

By admin | Published: July 18, 2016 01:51 AM2016-07-18T01:51:09+5:302016-07-18T01:51:09+5:30

हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला.

Destiny has shattered everything, even government help is inadequate | नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

Next

आगीत घर जळाले : रामदीन यांनी मांडली 'लोकमत'समोर व्यथा
वतन लोणे घोडपेठ
हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला. राहण्यासाठी निवारा उभा केला. आवश्यक वस्तू घरात आणल्या. गरिबीचे असले तरी एक-एक दिवस समाधानाचे जात होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच दडले होते.
दोन महिन्यांपूर्वी २२ मे रोजी भर दुपारी रणरणत्या उन्हात अचानक आग लागली. प्रचंड तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीचा जोर वाढतच गेला. काही कळायच्या आतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. रामदीन यादव, पत्नी मनोरमा व नातू अनिकेत कसेबसे जीव वाचवून घराबाहेर पडले. लोकांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
आगीने रौद्ररूप धारण केले होते. राहते घर, अन्नधान्य, चीजवस्तू, कागदपत्रे आगीत भस्मसात होताना उघड्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका क्षणात सारे काही संपले होते. मेहनतीने उभ्या केलेल्या ४० वर्षांंच्या संसाराची राखरांगोळी झाली. अंगावरचे कपडे तेवढे उरले.
ताडाळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात (उमरी रीठ) राहणारे रामदीन यादव आणि त्यांचे कुटुंब या दु:खातून अजूनही सावरले नाही. आग विझवताना रामदीन यांची पाठ पोळली गेली. तो घाव अजूनही दुरूस्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. आगीने सर्वस्व हिरावल्यामुळे जवळ पैसाही नाही. परिणामी जगायचे कसे, या विवंचनेत रामदीन आणि त्यांचे कुटुंबीय एक-एक दिवस काढत आहेत.
ताडाळी ग्रामपंचायतीने घटनेच्या दिवशी पाच हजारांची मदत केली. तसेच तहसिल कार्यालयाकडून ६ हजार ७५० रूपयांचा मदतीचा धनादेश मिळाला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच वाढत्या महागाईच्या काळात ही मदत खुपच तोकडी असून या मदतीतून स्वत:वर उपचार करावे, की घरखर्च भागवावा, या विवंचनेत रामदीन सापडले आहेत. त्यामुळे शासनाने उचित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, बीपीएल यादीत नाव असूनही घरासाठी जमीन नावावर नाही. त्यामुळे आतापर्यंत घरकूल योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याची खंतही रामदीन यांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.

Web Title: Destiny has shattered everything, even government help is inadequate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.