समारंभातील अन्नाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:44+5:302021-02-08T04:24:44+5:30
लग्नसोहळा व कोणताही कार्यक्रम जेवणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आज या जेवणावळीचे स्वरूप बदलले असून, पंगतीची जागा आता बुफेने ...
लग्नसोहळा व कोणताही कार्यक्रम जेवणाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आज या जेवणावळीचे स्वरूप बदलले असून, पंगतीची जागा आता बुफेने घेतली आहे. मात्र, या पद्धतीने अन्नाची नासाडी होत आहे.
कार्यक्रमात गर्दीत पुन्हा पुन्हा रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. भुकेपेक्षा जास्त अन्न घेतल्याने पोट भरल्यावर हे अन्न फेकले जाते. एका लग्नसोहळ्यात किमान शंभर ते दीडशे लोकांचे अन्न वाया जात असल्याचे दिसून येते. उकिरड्यावर फेकलेले अन्न सडले की, त्यातून प्रदूषण होते. एकीकडे अनेकांना अन्न मिळत नाही तर दुसरीकडे अशा प्रकारे अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. ताटातील उष्टे अन्न उकिरड्यात टाकून दिल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अनेकदा उरलेले अन्न पाण्यातही टाकण्यात येते, त्यामुळे नद्याही प्रदूषित होत आहेत. अन्नाची अशी नासाडी करण्यापेक्षा उरलेले अन्न गरजूंना देऊन आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे. विशेष म्हणजे, कोरोना संकटामध्ये ज्या पद्धतीने समारंभ आयोजित केले जात होते, त्याच पद्धतीने कमी पाहुण्यांमध्ये समारंभ आटोपून होणारा व्यर्थ खर्च वाचविणे गरजेचे आहे.