डौलात उभ्या पिकाची वन्यप्राण्यांकडून नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:37+5:302021-09-05T04:31:37+5:30
वासेरा : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत असलेल्या वासेरा शिवारात वण्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून उपद्रव सुरू केला आहे. ...
वासेरा : ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत असलेल्या वासेरा शिवारात वण्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून उपद्रव सुरू केला आहे. डौलात उभे असणारे पीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत आहे. वन्यप्राण्यांनी पिकाची केलेली नासधूस पाहून शेतकरी हवालदिल झालेला असून वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे यांना शेतकऱ्यांनी दिले.
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर बफरचे मुख्य वनसंरक्षक यांनासुद्धा वासेरा येथील नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. शिवणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे वासेरासह परिसरातील शिवणी, शिरसाळा, सिंगडघरी, मोहाडी, नलेश्वर, जामसाळा, गडबोरी, कळमगाव, पेडगाव येथील शेतकरी १०० टक्के शेती व्यवसाय करतात. येथील नागरिकांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागते. सध्या शेतात धानाचे पीक डौलात उभे असून हिरवेगार शिवार झाले आहे; परंतु या हिरव्यागार पिकांना वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत करण्याचा उपद्रव सुरू केला आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांसाठी कायमची समस्या झालेली आहे. या वन्यप्राण्यांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हिंस्र पशूंच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांसह पशू पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान व वन्यप्राण्यांचा धुमाकूळ थांबविण्यासाठी वनविभागाने कायमची उपाययोजना करावी. याकरिता वासेरा येथील २०० नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. तुपे यांचे मार्फत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे मुख्य संरक्षक यांना पाठविले आहे. यावेळी वासेरा येथील सरपंच महेश बोरकर, ग्रामपंचायत माजी सदस्य राजू नंदनवार, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू बोरकर, रवींद्र बोरकर, गिरिधर नाकाडे, सुरेश आत्राम, पत्रकार महेंद्र कोवले उपस्थित होते.
040921\img-20210904-wa0055.jpg
वनविभागाला निवेदन देतांना