तिसरी लाट थोपवून ठेवण्याचा बल्लारपूर यंत्रणेचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:09+5:302021-05-25T04:32:09+5:30
रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन : बल्लारपूर तालुक्यात २१ हजार नागरिकांचे लसीकरण राजेश खेडेकर बल्लारपूर : कोरोना हे लागोपाठ दोनदा ...
रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन : बल्लारपूर तालुक्यात २१ हजार नागरिकांचे लसीकरण
राजेश खेडेकर
बल्लारपूर : कोरोना हे लागोपाठ दोनदा आलेले जीवघेणे मोठे संसर्गजन्य संकट असले तरी त्याचा धीराने मुकाबला करण्याकरिता आरोग्य, प्रशासकीय यंत्रणा नेटाने कामाला भिडली व अजूनही भिडून आहे. येणारी संभाव्य तिसरी लाट थोपवून ठेवण्याचा संकल्प बल्लारपूर तालुक्यातील आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेने केला आहे.
बल्लारपूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव २२ मे २०२० विसापूर या गावात झाला. त्यानंतर कोरोना संसर्गाने तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात पाय पसरविणे सुरू केले. या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आरोग्य, पोलीस, तसेच नगरपालिका व महसूल प्रशासन कामी लागले. कोरोनाबाधित क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त करणे सुरू झाले. जनजागृती व उपाययोजना करण्यात आल्यात. तरीही या नवीन रोगाने ग्रामीण भागात २०२, तर शहरी भागात ९७२ जणांना बाधित केले.
विलगीकरण याची सोय भिवकुंड परिसरातील शासकीय विद्यालयात करण्यात आली व अधिक प्रमाणात बाधितांना चंद्रपूरला उपचारार्थ धाडण्यात आले. त्यातील ग्रामीण भागातील ४, तर शहरी भागातील २४ अशा २८ जणांचा बळी गेला. यात ६० वर्षे वयातील मृतकांची संख्या अधिक होती.
बॉक्स
दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणावर भर
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर यावर्षीच्या आलेल्या दुसऱ्या तीव्र गतीच्या लाटेने यंत्रणा खडबडून परत जागी व सज्ज झाली. बाधितांना संस्थात्मक विलगीकरण आणि रुग्णालयात पाठविण्यात आले. बाधितांची संख्या वाढल्याने गृह विलगीकरण हा पर्याय निवडावा लागला. विलगीकरण कक्षांमध्ये वाढ केली गेली. लसीकरणावर भर देण्यात आला. तरीही दुसऱ्या लाटेत २४ मेपर्यंत शहरी भागात ३१९०, तर ग्रामीण भागात ६४६ जण कोरोना बाधित झालेत. उपचारांदरम्यान, रुग्णालयात शहरी भागातील ५६, तर ग्रामीण भागातील १४ जणांना मृत्यूने गाठले. दुसऱ्या लाटेत ३० ते ५० या वयोगटांतील मृतांचा आकडा जास्त आहेत. हा आकडा २४ मे पर्यंतचा!
बॉक्स
दोन्ही लाटेत ९८ जणांचा बळी
दोनही लाटेत तालुक्यात कोरोनाने आजवर ९८ जणांना हिरावून नेले आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यू पावलेल्यांमध्ये ३० ते ५० वर्षे वयोगटांतील अधिक आहेत. आजच्या घडीला तालुक्यात २१ हजार २७ लोकांचे लसीकरण झाले असून, ५७७ कोरोनाबाधित आहे व ४५० रुग्ण गृहविलगीकरणामध्ये आहेत.
बॉक्स
तिसऱ्या लाटेसाठी जय्यत तयारी
तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत, ती कशी थोपविता येईल याची तयारी व तसे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत. आजच्या घडीला ४० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर असून, परिसरात शासकीय विद्यालयातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये ऑक्सिजनयुक्त ५० बेड व बॉईज हॉस्टेलमध्ये १०० बेडची व्यवस्था केली आहे. त्यातील ४० बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात येत आहेत. विसापूर येथील क्रीडा संकुलात एकूण १०० बेड असून, त्यात ३० ऑक्सिजन बेडच्या सुविधेचे काम प्रगतिपथावर आहेत. ते येत्या आठवड्यात पूर्णतः वर येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल कोहपरे यांनी माहिती दिली. प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन जनतेला सर्व माध्यमातून केले जात आहे.
बॉक्स
नव्या नियुक्ती
संभाव्य तिसऱ्या लाटेवर मात करण्याकरिता १० नवीन डॉक्टर व ४० परिचारिका घेतल्या जात आहे. लसीकरणानेच कोरोना थोपविता येतो. याकरिता तालुक्यात एकूण ११ लसीकरण केंद्रे आहेत. २४ मेपासून मानोरा शिवनी व कळमना येेथेही नव्याने केंद्र सुरू झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन करण्यात आली असून, अध्यक्ष तहसीलदार असतील. यात आरोग्य पोलीस नगरपालिकेचे असे एकूण सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोट
तिसऱ्या लाटेच्या नावाने घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभागाने त्याची सर्व तयारी केली आहे. लोकांनी नियमांचे पालन करून शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे एवढेच!
-डॉ. अतुल कोहपरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, बल्लारपूर.
===Photopath===
240521\img-20210524-wa0007.jpg
===Caption===
तिसरी लाट थोपवून ठेवण्याचा संकल्प!रॅपिड रिस्पॉन्स टीम गठीत-बल्लारपूर तालुक्यात २१ हजार नागरिकांचे लसीकरण-दोन लाटेत ९८ मृत्यू
राजेश खेडेकर