५० कोटी वृक्ष लागवडीचा वनविभागाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:57 PM2017-09-16T22:57:31+5:302017-09-16T22:57:49+5:30
राज्यात पुढील दोन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात पुढील दोन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये वन विभागाकडून २०१७ मध्ये ४ कोटी, २०१८ मध्ये १३ कोटी व २०१९ मध्ये ३३ कोटी असे ५० कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक घेण्यात आली.
बैठकीत जिल्हाधिकारी सलिल यांनी, सन २०१८ मध्ये जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी पुढाकार घेवून आतापासूनच नियोजन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या संकेस्थळावर जिल्ह्यात महसूल तसेच वनविभागाकडे असलेल्या झुडपी जंगलांची माहिती उपलब्ध केली जाईल. त्या झुडपी जंगलात सर्व शासकीय यंत्रणेला वृक्ष लागवडीसाठी ते जंगल उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, मुख्य व्यवस्थापक उत्तर राहुरकर, विभागीय व्यवस्थापक पाटील, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व इतर यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.