खुल्या जागांचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:27 AM2021-03-06T04:27:26+5:302021-03-06T04:27:26+5:30
नामफलक नसल्याने प्रवाशांची अडचण चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश ...
नामफलक नसल्याने प्रवाशांची अडचण
चंद्रपूर : जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग, तालुका मार्ग, ग्रामीण मार्ग गेले आहेत. मात्र यातील बहुतांश रस्त्यावर गावाच्या नावाचा फलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
बालाजी वार्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील बिनबा गेट रोड बजाज पॉलिटेक्निक कॉलेजजवळील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून मोठ्या संख्येने रेलचेल असते. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
बंद सिग्नलमुळे वाहनधारक त्रस्त
चंद्रपूर : येथील ट्रायस्टार होटेल चौक, पडोली चौक, मीलन चौक तसेच बाबूपेठ परिसरातील रस्त्यावरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील सर्व सिग्नल सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांतून निघणाऱ्या धुरांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी चंद्रपुरातील जनतेने केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
चंद्रपूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वाॅर्ड आणि मुख्य चौकात कुत्र्यांचा संचार वाढला. त्यामुळे मनपाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वीजखांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : शहरातील सिव्हिल लाइन तसेच रामनगर चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र खांब काढण्यात न आल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वीजखांब हटविण्याची मागणी केली जात आहे.
सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोरपना येथे दर शुक्रवारी तर गडचांदूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात.
आधार कार्डसाठी नागरिकांची गर्दी
चंद्रपूर : ग्रामीण भागातील काही गावांतील नारिकांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याने नागरिक आधार कार्ड काढण्यासाठी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड नोंदणी केंद्र शोधताना नागरिक दिसत आहे. त्यामुळे आधार कॉर्ड काढणारी केंद्र सुरु करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम थंड बस्त्यात
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. बऱ्याचदा वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. दुचाकी घसरून अनेकांचे अपघातही झाले आहेत.
नाल्यांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरातील काही नाल्यांमध्ये कचरा तुंबल्यामुळे या नाल्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. त्यामुळे वाॅर्डनिहाय नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.