चंद्रपूरला बनविणार विकासाचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:48 PM2018-01-24T23:48:11+5:302018-01-24T23:50:19+5:30

पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात.

Development model to make Chandrapur | चंद्रपूरला बनविणार विकासाचे मॉडेल

चंद्रपूरला बनविणार विकासाचे मॉडेल

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : इरई नदीवर साकारणार ६५ कोटींचा केबल स्टेड पूल

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : पुण्याचे नगरसेवक मूलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात. आता साबरमतीच्या धर्तीवर इरई नदीच्या घाटाचा विकास आपण करणार आहोत. इरई नदीवर मुंबईतील सी-लिंगसारखा पूल पुढील दीड वर्षात तयार होणार आहे. पाचवेळा निवडून देणाऱ्या जिल्हावासीयांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. नागरिकांचे आशीर्वाद कार्य करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला सर्व क्षेत्रात विकासाचे मॉडेल बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
इरई नदीच्या काठावर हजारो लोकांच्या उपस्थितीत बुधवारी ना. मुनगंटीवार यांनी नव्या व जुन्या चंद्रपूरला जोडणाºया ६५ कोटी १९ लाख रुपयांच्या दाताळा पुलाचे भूमीपुजन केले. यावेळी ते बोलत होते. चौपदरी असणाऱ्या या पुलामुळे चंद्रपूरच्या वैभवात भर पडणार असून इरई नदीला कितीही मोठा पूर आला तरी जुन्या व नव्या शहराचा संपर्क तुटणार नाही, अशी उंची या पुलाला मिळत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नवीन चंद्रपूर विकसित होण्यासाठी गती येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, वरोराचे आमदार बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, म्हाडाचे संचालक संजय भिमनवार, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, सभापती अनुराधा हजारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आजच्या भूमिपूजनाने पूर्ण होत आहे, असे स्पष्ट केले. यासाठी म्हाडाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून त्यापैकी ६५.१९ कोटी रुपयामध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. तर उर्वरित निधीमध्ये इरई नदीच्या घाटाचा विकास केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बसस्थानकेही होणार सुसज्ज
चंद्रपूर येथील बसस्थानकाचे २६ जानेवारीला भूमिपूजन केले जाणार आहे. जिल्हयातील अन्य बसस्थानकांच्या कामालाही सुरुवात होणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूरमधील जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी २५७ कोटींची योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील शाळांना ३५८ खोल्या आगामी काळात बांधून देण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये शाळेतील खोल्यांचे बाधकाम पूर्ण झालेला जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव पुढे येईल, असे स्पष्ट केले. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देखणी इमारत केवळ वास्तू म्हणून नव्हे तर रोजगाराची संधी देणारे नवीन केंद्र म्हणून ओळखले जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्राला हेवा वाटावा
चंद्रपूर जिल्हयात विकास व्हावा, यासाठी सत्तेत नसताना प्रचंड संघर्ष केला आहे. आज जेव्हा सत्ता आपल्याकडे आहे आणि जनतेचा आशीर्वाद पाठीशी असताना महाराष्ट्रातील सर्व आघाडयांवर विकसित जिल्हा म्हणून काम करण्याचा सपाटा गेल्या तीन वर्षात सुरु केला असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रापासून राज्यातील अन्य भागातील लोकांना हेवा वाटावा, अशा वेगळया पध्दतीचा विकास व त्यातून रोजगारांची संधी देण्यासाठी आपली धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Development model to make Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.