येत्या दहा महिन्यात जिवती कोरपन्याचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:42 PM2018-03-30T23:42:34+5:302018-03-30T23:42:34+5:30
जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे. पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील.
आॅनलाईन लोकमत
कोरपना : जिवती -कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहे. पुढच्या १० महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृती आराखडा तयार करा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कोरपना पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अॅड. संजय धोटे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, गोदावरी केंद्रे, उपविभागीय अधिकारी क्रांती कोंबे, तहसीलदार हरीश गाडे, पं.स. सभापती श्यामबाबू रणदिवे, उपसभापती संभाजी कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, कल्पना पेचे, विना मालेकर, पं.स. सदस्य सिंधू आस्वले, रुपाली तोडासे, नूतन जीवने, महेश देवकते, संवर्ग विकास अधिकारी संदीप घोन्सीकर आदी उपस्थित होते.
पिंपळगाव येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील पंचायत समितीच्या सर्व माजी सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी २०१६-१७ मध्ये तालुका स्मार्ट ग्राम कुकुडसात व यावर्षी २०१७-१८ मध्ये तालुका स्मार्ट ग्राम ठरलेल्या बिबी येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक सहायक संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी संदीप घोन्सीकर यांनी केले.