चंद्रपूरचा विकास आराखडा सादर

By admin | Published: June 3, 2016 12:50 AM2016-06-03T00:50:28+5:302016-06-03T00:50:28+5:30

चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत शहराचा विकास नाही. उलट शहरात गजबजलेल्या वस्त्या तयार होऊन शहर सौंदर्याला बाधा पोहचत आहे.

Development Plan for Chandrapur | चंद्रपूरचा विकास आराखडा सादर

चंद्रपूरचा विकास आराखडा सादर

Next

चंद्रपूर : चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत शहराचा विकास नाही. उलट शहरात गजबजलेल्या वस्त्या तयार होऊन शहर सौंदर्याला बाधा पोहचत आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षांना विचारात घेऊन चंद्रपूर शहराचा विकास आराखडा आज गुरुवारी मनपाच्या वतीने सादर करण्यात आला. पार्र्कींग, ड्रेनेज, सिव्हरेज, रस्ता रुंदीकरण, नद्या-तलावांचे सौंदर्यीकरण, ओपनस्पेसचा विकास आदी बाबी या आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर शहराची भौगोलिक स्थिती पाहली तर चंद्रपूर शहराचे विस्तारिकरण केवळ नागपूर आणि ताडोबा मार्ग या दोनच बाजुने होऊ शकते. उर्वरित बाजू कोल माईन्स आणि इरई नदीमुळे बंदिस्त झाल्या आहेत. यामुळे हद्दवाढीची गरज आहे. शहरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नळ योजनेतून पाणी मिळायला पाहिजे, असे शासकीय धोरण आहे. मात्र शहरातील केवळ ३३ टक्के कुटुंबाकडेच नळ कनेक्शन असल्याचे आराखडा तयार करणाऱ्या खासगी कंपनीच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे यादृष्टीने नळ योजनेचे विस्तारिकरण आराखड्यात सूचविण्यात आले आहे. याशिवाय ३५ एमएलडी पाणी व्यर्थ जात आहे. हे पाणी वाचविण्यासाठीही काही उपाययोजना आराखड्यात प्रस्तावित केल्या आहेत. चंद्रपूर शहरात अत्यंत जुनी आणि कालबाह्य पाईप लाईन आहे. या लाईनला ठिकठिकाणी लिकेजेस आहेत. सध्या नागरिकांना दिवसातून एक ते दोन तास नळद्वारे पाणी पुरवठा होतो. चंद्रपूरला मनपा होऊन चार वर्ष झालीत. पुढच्या २५ वर्षात चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले असेल. अशा परिस्थितीत २४ तास नळाद्वारे पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. यासाठी संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेतच बदल करण्याचे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी २२५ कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे.
चंद्रपूरची सर्वात मोठी समस्या आहे, शौचालयाची. स्वच्छ भारत मिशन, स्वच्छता अभियान व व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवूनही अद्याप शहर स्वच्छतेच चंद्रपूर मागासलेलाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या ७ टक्के आहे.
मात्र चंद्रपूर महानगरपालिका असतानाही येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या १९.३४ टक्के एवढी गंभीर आहे. सार्वजनिक शौचालयाची दूरवस्था, नागरिकांमध्ये असलेला अशिक्षितपणा आणि अठराविश्वे दारिद्र, या गोष्टी यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी घराघरात शौचालय बसविण्यासाठी मनपाकडून प्रयत्न करणे, अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करणे, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करणे व ठिकठिकाणी ई-टायलेटची व्यवस्था करणे या बाबी विकास आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत.
चंद्रपुरात २०१० पासून भूमिगत मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. या कामात अनेक त्रुट्या आढळून आल्या आहेत. चंद्रपूर शहराचा झपाट्याने होणाऱ्या विस्ताराचाही या योजनेत गांभीर्याने विचार झाला नाही. त्यामुळे आता सिव्हरेजची पाईप लाईन आणखी १६० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचे यात सूचविण्यात आले आहे.
शहरात १३० मेट्रीक टन कचरा दररोज निघतो. यातील ८० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस किंवा वीजनिर्मिती होऊ शकते.
मात्र केवळ १.५ टक्के कचऱ्यावरच बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया होत आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात घाणीचा विळखा असून आरोग्य बाधित होत आहे. त्यामुळे आरोग्य व शहर सौदर्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असल्याचे शहर विकास आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

वाहतुकीच्या कोंडीसाठी उपाययोजना
शहरात पार्र्कींगची व्यवस्था नगण्य आहे. बेलगाम पार्र्कींग, बायपास मार्गावरील वाहने शहरातूनच जाणे, अरुंद रस्ते यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यावरही या आराखड्यात उपाय सूचविले आहे. मोकळ्या जागेवर पार्र्कींग झोन निर्माण करणे, भूमिगत पार्र्कींगसाठी नियोजन करणे, फुटपाथवरील हॉकर्सला हटवून त्यांच्यासाठी स्वतंत्र झोन निर्माण करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी बाबी सूचविण्यात आल्या आहेत.

चंद्रपुरात नाल्यांची कमतरता
चंद्रपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवीन वस्त्या तयार होत आहे. मात्र तिथे नाल्यांची व्यवस्था अजूनही करण्यात आली नाही. चंद्रपूर शहरात ५३७ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यातील ६६ किलोमीटर रस्त्यांवर नाल्याच नाही. याशिवाय केवळ १४ टक्के नाल्यावर झाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहर सौंदर्य बाधित होत आहे. त्यामुळे नाल्यांचा तात्काळ विकास करण्यात यावा, असे आराखड्यात सूचविण्यात आले आहे.

सामाजिक संघटनांना वगळले
मनपा प्रशासनाच्या वतीने शहर विकास आराखड्याचे गुरुवारी मनपाच्या सभागृहात सादरीकरण करण्यात आले. यावेळी काही सूचना असल्यास त्या सादर कराव्या, जेणेकरुन त्यांचा समावेश आराखड्यात करता येईल, असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पुढारी, ज्येष्ठ व अभ्यासू नागरिक यांची यावेळी उपस्थिती दिसली नाही. त्यांना आमंत्रण देण्यात आले होते की नाही, याबाबत विचारणा करण्यासाठी आयुक्त सुधीर शंभरकर व उपायुक्त विनोद इंगोले यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक
अरुंद रस्ते ही चंद्रपूरची मोठी समस्या आहे. गिरनार चौक ते गांधी चौक, गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक, कस्तुरबा मार्ग यासारखे अनेक मार्ग यापूर्वीच टाऊन प्लॅनिंगमध्ये रुंद असावे असे नमूद आहे. मात्र प्रत्येक तसे नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण करणे शहर विकासात आवश्यक असल्याचे आराखड्यात प्रस्तावित केले आहे.

Web Title: Development Plan for Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.