दोन विधानसभा क्षेत्रांमध्ये रखडला ‘त्या’ गावांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:42+5:302021-08-21T04:32:42+5:30
ब्रह्मपुरी : लोकसभा व विधानसभा क्षेत्रांचे पुनर्विलोकन करताना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला. ...
ब्रह्मपुरी : लोकसभा व विधानसभा क्षेत्रांचे पुनर्विलोकन करताना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला. या गावातील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी ब्रह्मपुरी गाठावे लागते. विधानसभा चिमूर व ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये या गावातील विकास रखडला आहे.
सन २००९ ला पुनर्विलोकन करताना ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ गावांचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला. एकूण २८ ग्रामपंचायतींचा समावेश यात करण्यात आला आहे. येथील लोकसंख्या जवळपास ५० हजारांच्या घरात आहे. तालुक्याचे ठिकाण ब्रह्मपुरी असून, विविध शासकीय कामांकरिता नागरिकांना ब्रह्मपुरी येथेच यावे लागते. मुळात चिमूर क्षेत्राशी कोणताही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येत नाही.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी शासनाने, निर्वाचन आयोगाने पुन्हा पुनर्विलोकन करून या गावांचा समावेश ब्रह्मपुरी तालुक्यात करावा, अशी मागणी या गावातील नागरिक करीत आहेत.
बॉक्स
ब्रह्मपुरी तालुक्याबाबतच दुजाभाव का ?
सिंदेवाही, सावली तालुक्यातील संपूर्ण गावांचा समावेश ब्रह्मपुरी विधानसभेत करण्यात आला आहे. सिंदेवाही तालुक्यातील ७२ गावांचा ५१ ग्रामपंचायतींसह, तर सावली तालुक्यातील १११ गावांचा ५४ ग्रामपंचायतींसह समावेश करण्यात आला आहे. मात्र, ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ गावांना चिमूर विधानसभा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्याबाबतच असा दुजाभाव का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
200821\img_20210819_145839.jpg
अरहेर - नदागव रस्त्यात खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढावा लागतो