गायमुखच्या यात्रेत भाविकांची मंदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:12 AM2018-01-15T00:12:58+5:302018-01-15T00:14:08+5:30
गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर भरलेल्या यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी जागृत मारूतीचे दर्शन घेऊन गायमुखच्या कुंडात पवित्र स्नानही केले.
घनश्याम नवघडे ।
आॅनलाईन लोकमत
नागभीड : गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर भरलेल्या यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी जागृत मारूतीचे दर्शन घेऊन गायमुखच्या कुंडात पवित्र स्नानही केले.
मागील अनेक वर्षांपासून गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर यात्रा भरत आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूरजवळ हे स्थळ असून या ठिकाणी पश्चिम मुखी मारूतीचे मंदिर आहे. बाजूलाच असलेल्या एका छोट्याशा टेकडीतून पाण्याचा झरा अविरत वाहत असतो. या ठिकाणी गायीचे मुख बसविण्यात आले आहे. म्हणूनच या ठिकाणाला गायमुख हे नाव पडले असावे. वाहणाºया या झºयाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून स्नानासाठी दोन कुंड तयार करण्यात आले आहेत. यात स्त्रिया आणि पुरूषांची वेगवेगळी सोय आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी वर्षभरच भाविकांची गर्दी असते. पण मकर संक्रांतीला या ठिकाणी यात्राच भरत असते. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक या यात्रेत हजेरी लावत असून येथील कुंडात स्नान करीत असतात. संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही या स्थळाची ख्याती असली तरी या स्थळाचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्यापही विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले नाही. हे स्थळ अजूनही खासगी मालकीचे आहे. त्यामुळेच या स्थळाचा विकास झाला नाही.
पोलीस बंदोबस्त चोख
हे स्थळ तळोधी पोलीस ठाण्यातंर्गत आहे. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन तळोधी ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .
तिर्थ म्हणून उपयोग
झऱ्याच्या माध्यमातून गोमुखातून पडणाºया पाण्याचा उपयोग परिसरातील लोक तिर्थ म्हणून करीत असतात. पिकांवर येणाऱ्या विविध ,रोगराईवर हे तिर्थ गुणकारी आहे, असा समज असून या तिर्थाची पिकांवर फवारणीही करीत असतात.
या देवस्थानावर खासगी मालकी हक्क असले तरी ते लोकभावनेचे प्रतिक आहे. या स्थळाचा विकास व्हावा. एवढेच नाहीतर तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशीही नागरिकांची इच्छा आहे. या प्रभागाचा जि.प.सदस्य या नात्याने ही लोकभावना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत पोचवून या स्थळाच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.
- संजय गजपुरे, जि.प.सदस्य बाळापूर - पारडी