माता महाकाली यात्रेच्या महापूजेत उसळला जनसागर, महाआरतीनंतर महाप्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:45 AM2023-04-07T11:45:23+5:302023-04-07T11:49:39+5:30
राज्यभरातून आलेले भाविक परतीच्या वाटेवर
चंद्रपूर : माता महाकाली यात्रा महोत्सवातील मुख्य महापूजेसाठी गुरुवारी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मोठ्या भक्तिभावाने हजारो भाविक दाखल झाले. दुपारी एक वाजता महाआरती करण्यात आली. चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेला अश्वावर स्वार होऊन चंद्रपुरात पोहोचण्याची १८६० मध्ये यमुनामाय यांनी सुरू केलेली परंपरा आजही त्यांचे वंशज जपत आहेत. यमुनामायचे आगमन झाल्यानंतर माता महाकालीचा जयघोष झाला. महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. नांदेडसह राज्यभरातून आलेले भाविक आता परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
२७ मार्चपासून सुरू झालेल्या महाकाली यात्रेतील मुख्य पूजेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविक मंदिर परिसरात दाखल झाले. गुरुवारी पहाटे चार वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, महाकाले परिवाराचे सुनील महाकाले, त्यांच्या धर्मपत्नी क्षमा महाकाले यांनी माता महाकालीची पूजा केली. अभिषेक व नैवेद्य अर्पण केले. ही पूजा सकाळी ६.३० वाजेपर्यंत चालली. दुपारी एक वाजता महाआरती झाल्यानंतर भाविकांना पुरणपोळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुवारी यात्रेचा शेवटचा दिवस असल्याने दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. अंचलेश्वर मंदिर परिसरातही पारंपरिक भक्तिगीते गाऊन पूजा अर्चना करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविक दाखल झाल्याचे दिसून आले.
महाकालीची मूर्ती देऊन यमुनामायचे स्वागत
१६३ वर्षांपूर्वी ही परंपरा यमुनामाय यांनी सुरू केली. उट्टलवाड वंशातील ९३ वर्षीय यमुनामाय ही परंपरा पुढे नेत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूर येथील महाकाली मंदिर असा यमुनामायचा प्रवास मार्ग होता. मात्र, यंदा प्रथमच मार्गात बदल करून यमुनामाय आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. आमदार जोरगेवार, अम्मा ऊर्फ गंगुबाई जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, रंजिता जोरगेवार, आदींनी माता महाकालीची मूर्ती व शाल, श्रीफळ देत यमुनामायचे स्वागत केले. यावेळी गोविंद उट्टलवार, लक्ष्मीबाई उट्टलवार, सुनील उट्टलवार, अनिल उट्टलवार, नरहरी उट्टलवार, राम पोतराजे, बळिराम पोतराजे, माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते, सूर्यकांत खनके, मिलिंद गंपावार उपस्थित होते.
हजारो भाविकांचे पवित्र स्नान
यात्रेकरूंसाठी मनपाने विविध सोयी-सुविधा पुरविल्या. सात निर्माल्य कलशांची उभारणी केली. झरपट नदीपात्रातील इकोर्निया वनस्पती काढून स्वच्छता केली. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात १००० लिटरची क्षमता असलेल्या १५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसविल्या. भाविकांना अंघोळीसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरची व्यवस्था केली. यामध्ये हजारो भाविकांनी पवित्र स्नान केले.
व्यावसायिकांची बंपर विक्री
यात्रा परिसरात पूजा साहित्य, विविध वस्तूंची दुकाने लावली होती. यंदा भाविकांची गर्दी उसळल्याने वस्तूंची बंपर विक्री झाली. मंदिर परिसरात दुकानदारांद्वारे कचरा निर्माण होऊ नये, यासाठी मनपाच्या उपद्रव नियंत्रण पथकांनी नियमित पाहणी ठेवल्याने अडचणी आल्या नाही.