भक्तांना झाले ताडोबा देवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:56 PM2017-12-24T23:56:12+5:302017-12-24T23:59:18+5:30
पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : पारंपारिक प्रथेनुसार पौष महिन्यातील प्रत्येक रविवारला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘ताडोबा’ देवाची जत्रा भरीत असे. परंतू या जंगलाला राखीव केल्यानंतर वनप्रशासनाने यात्रेवर बंदी आणली. यंदा आठ गावातील आदिवासी व इतर बांधवांनी ताडोबा देवाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले. त्यानुसार शेकडो बांधव दर्शनासाठी निघाले असता त्यांना अडविण्यात आले. मात्र वनविभागाचे अधिकारी व गावकºयांच्या दीर्घ चर्चेनंतर अखेर शासकीय वाहनाद्वारे त्यांना दर्शनार्थ वनविभागाने स्वत:च नेले.
ताडोबा शेजारील चंदनखेडा, वडेगाव, कोंडेगाव, काटवल, खुटवडा, घोसरी, वायगाव, पिर्ली या आठ गावातील आदिवासी तसेच इतर ग्रामस्थांनी ताडोबा देवाचे दर्शन घेऊ द्यावे, या संदर्भात वनविभागाला निवेदन दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी १० वाजता सर्व गावातील भाविक खुटवंडा-काटेझरी या प्रवेशद्वाराजवळ आले. नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुडेवार व माधव जीवतोडे यांनी केले. या जंगलाला व्याघ्र प्रकल्प घोषित केल्यामुळे या प्रकल्पात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या वाहनाने किंवा पायदळ प्रवेश करण्यास बंदी केली आहे. ग्रामस्थ रविवारी येणार म्हणून वनविभागाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ताडोबा देव हे आमचे श्रद्धास्थान असल्याने आमचे पूर्वज त्याची पूजा-अर्चा करीत पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी कोंबडे व बकºयाचा बळी देत होते. मात्र वनविभागाने या प्रथेच मज्जाव घातला. मात्र यावेळी समाजातील कार्यकर्ते सुधीर मुडेवार व माधव जीवतोडे यांच्या पुढाकाराने दर्शन घेण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी शेकडो भाविक एकत्र जमा झाले. या ठिकाणी त्यांना अडविण्यात आले. मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी, उपवनसंरक्षक कुलकर्णी आणि खुपसे, विभागीय वनाधिकारी किशोर मानकर, मोहुर्लीचे क्षेत्र सहायक राजूरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी गावकºयांना आपल्या वाहनांनी ताडोबा देवाचे दर्शन घडविले. यावेळी दंगा नियंत्रक पथकाच्या तीन गाड्यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. एसडीपीओ प्रताप पवार गर्दीवर नियंत्रण ठेवून होते.