महाकाली देवीच्या यात्रेसाठी भाविकांची चंद्रपुरात मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 02:03 PM2022-04-08T14:03:26+5:302022-04-08T14:07:22+5:30
कोरोनातील दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच महाकाली देवी मंदिर परिसर भाविकांनी फुलला आहे.
चंद्रपूर : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेली चंद्रपूरचे आराध्य दैवत महाकाली देवीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी (दि. ७ एप्रिल)पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात दाखल होत असून, चैत्र पौर्णिमेला देवीची विशेष पूजाअर्चा करण्यात येणार आहे.
दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच महाकाली देवी मंदिर परिसर भाविकांनी फुलला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन तसेच महाकाली देवी मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तयारी केली आहे. कोरोनाकाळानंतर यावर्षी भाविकांना महाकाली मातेचे दर्शन घेता येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनातील विविध विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. यात्रास्थळी पाणी, शौचालय, निवास, आरोग्य यासह विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भाविकांना देवीचे दर्शन घेताना उन्हाचा फटका बसू नये, यासाठी रांगेत लागणाऱ्या भक्तांसाठी पाण्याचे फवारे लावण्यात आले आहेत. मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली असून, परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संकट जाऊ दे
यात्रा सुरू झाल्याने चंद्रपुरात भक्त दाखल होत आहेत. प्रथम जटपुरा गेटजवळ अनेक जण नारळ फोडून पुढे देवीच्या दर्शनाला जात आहेत. दरम्यान, जगावर आलेले कोरोनाचे संकट नाहीसे होऊ दे, सर्वांनी सुखी ठेव, पीक-पाणी होऊ दे, अशी आराधना भाविक देवीकडे करीत आहेत.