चंद्रपुरात आजपासून धम्मचक्र अनुवर्तन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:50 PM2017-10-14T23:50:14+5:302017-10-14T23:50:54+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६१ वर्षापूर्वी इतिहासात सोनेरी पान लिहिले. समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या घटनेला उजाळा म्हणून लाखो बौद्ध बांधव दरवर्षी दीक्षाभूमीवर समतेचा जागर करतात. ही आठवण सतत व्हावी म्हणून येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६१ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजतापासून धम्मध्वजारोहण करून तथागत बुद्धाच्या धम्माचा जागर केला जाणार आहे. यासाठी देश-विदेशातील बौद्ध भिक्खूंची उपस्थिती राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला रविवारी सायंकाळी ५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, भदंत डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), मनपाचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांची उपस्थिती राहणार आहेत.
१६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह समता सैनिक दलाच्या पथसंचलनाची लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. यावेळी प्रमुख सोहळ्याला पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित राहणार आहेत.
पुस्तकांच्या स्टॉलवरही दिसणार निळाई
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लेखनाच्या माध्यमातून मुक समाजात वेदनेचा हुंकार भरला. आजघडीला दलित साहित्य चळवळीचा आत्मा ठरले आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येणारा आंबेडकरांचा अनुयायी मानवतेचा संदेश देणारे एकतरी पुस्तक घेतो. यासाठी पुुस्तकांच्या स्टॉलची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली जाते. कोठेही उपलब्ध न होणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध आणि अन्य पुरोगामी विचाराचे साहित्य दीक्षाभूमीवर सहज मिळते. यामुळे पुस्तकांच्या स्टॉलवरही भीम निळाई अवतरणार आहे. पुस्तकासोबतच मूर्ती आणि भीम बुद्ध गीताच्या माध्यमातून क्रांतीचा संदेश देणाºया सीडीचे स्टॉल लागले असते.
सामाजिक बांधिलकीतून केले जाते भोजनदान
येथील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायी येथील दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. ही संख्या लाखोंवर असते. दीक्षाभूमीवर येणारा बांधव उपाशी राहू नये म्हणून शहरातील विविध सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नगरसेवक, कर्मचारी संघटना भोजनदान करतात. यामुळे सकाळच्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व प्रकारची सोय दीक्षाभूमी परिसरात करण्यात आलेली असते.