धाबानगरी कोंडय्या नामाने दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:49 PM2019-02-04T22:49:26+5:302019-02-04T22:49:43+5:30
परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
धाबा : परमहंस कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झााली आहे. या निमित्ताने कोंडय्या महाराजांच्या पादुकाची गावातून पालखी काढण्यात आली. यात भक्तांचा सागर उसळला होता. धाबा नगरी कोंडय्या नामाने दुमदुमून गेली होती.
सर्वप्रथम संस्थानचे माजी अध्यक्ष बबनराव पत्तीवार, संस्थान सचिव किशोर अगस्ती व विश्वस्त मंडळ वाल्मिकी युवक मंडळ नारायण पेटकर व त्यांचा संच, हनुमंत चंदनगिरीवार, महालक्ष्मी महिला बचत गट अध्यक्ष कविता चनेकार व महिला मंडळ, स्वामी समर्थ महिला बचत गट अध्यक्ष माला सिडाम व महिला मंडळ व गावातील नागरिकांकडून ग्रामसफाई करण्यात आली. सकाळी ९ वाजता महाराजांच्या समाधीचा अध्यक्ष अमर बोडावार व वैष्णवी बोडलावार यांच्याकडून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गावातील महिला कलश डोक्यावर पकडून हिरवा शालू परिधान करून एकसमान वेशात कलश यात्रेला सुरूवात झाली. महाराजांच्या मंदिरातून काढण्यात आलेली महाराजांची पालखी फुलांनी सजविलेली होती. कोंडय्या नामाचा जल्लोष सातत्याने सुरू होता. परिसरातील सोमनपली, हिवरा, डोंगरगाव, दरूर, चिंचोली, लाठी, विरूर स्टेशन, वेडगाव सकमूर, सोनापूर देशपांडे आदी गावातील भजन मंडळी, वारकरी भजन मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखीचे स्वागत ठिकठिकाणी करण्यात आले. अनेकांनी भक्तांना चहा पाण्याचे वितरण केले. समाजसेवी मंडळानी पालखीतील सहभागी भक्तांना अल्पोपहाराची व्यवस्था केली. वाल्मिकी युवक मंडळाकडून आलूपोहा, मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातील युवकांना मसाला भात व मठ्ठाचे वाटप करण्यात आले. तसेच वॉर्ड नं. २ मध्ये मुरमुरा - चिवडा व जिलेबी हे वाटप करण्यात आले. बरमाई मंदिर परिसरात मसाला भाताचेसुद्धा वाटप करण्यात आले. पालखी गावातून फिरून आल्यांनतर संस्थान अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी भजन मंडळीना त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भेट देण्यात आले व आरती महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या पालखीसाठी हजारो भाविक तेलंगणा व विदर्भातील होते, हे विशेष.