धानोरकरांनी अधिकाऱ्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:51 AM2018-12-24T00:51:55+5:302018-12-24T00:52:23+5:30
मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता विविध कामांचे २६३ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आले. त्यात १५ टक्के प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्ताव एक वर्षांचा कालावधी लोटूनही मंजूर झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई दूर व्हावी याकरिता विविध कामांचे २६३ प्रस्ताव मंजुरीकरिता पाठविण्यात आले. त्यात १५ टक्के प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्ताव एक वर्षांचा कालावधी लोटूनही मंजूर झाला नाही. त्यामुळे टेमुर्डा येथे आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार बाळू धानोरकर चांगलेच संतप्त झाले. या आढावा बैठकीत त्यांनी उपस्थित अधिकाºयांना चांगलेच खडेबोल सुनावले.
वरोरा तालुक्यातील सन २०१८-१९ च्या पाणीटंचाई आढावा सभा टेमुर्डा येथील ग्रामपंचायत भवनात पार पडली. यावेळी आमदार बाळू धानोरकर, पं. स. सभापती रोहिणी देवतळे, पं. स. उपसभापती विजय आत्राम, जि. प. सदस्य सुनंदा जीवतोडे, पं. स. सदस्य नारायण कारेकार, बाजार समिती सभापती विशाल बदखल, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मिलींद भोयर, उपाध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती राजू चिकटे आदी उपस्थित होते. मागील बैठकीचे इतिवृत्त मागील वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, पाईपलाईन दुरुस्ती, विंधन विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, नळयोजना विशेष दुरुस्ती आदी कामांचे २६३ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यात ३४ प्रस्ताव वर्षभरात मंजूर झाले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जे प्रस्ताव पाठविले. त्याचा पाठपुरावा केला नाही.
लोकप्रतिनिधींना वर्षभरात माहिती दिली नाही. याचा परिणाम पाणीपुरवठा योजनेला विशेष निधी मिळाला नाही व अनेक कामे प्रलंबित राहिली. मागील वर्षातील कामे मार्गी लागली नाही तर या वर्षाची सभा घेताच कशाला, असा संतप्त सवाल सभेत आमदार धानोरकर यांनी उपस्थित करून यामध्ये दोषी अधिकाºयांवर कारवाई होणार असल्याचेही संकेत दिले.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे बैठक
उमरी ग्रामपंचायत पाईपलाईन निकृष्ट, करंजी नळ योजना, शेंबळ येथील पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून काम अपूर्ण आहे. या सर्व योजना मार्गी लावाव्यात. याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन आमदार धानोरकर यांनी यावेळी दिले. टेमुर्डाचे सरपंच मारोती झाडे, तहसीलदार सचिन गोसावी, पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता हेडाऊ, बाजार समितीचे संचालक देवानंद मोरे, माजी उपसभापती भोजराज झाडे, संवर्ग विकास अधिकारी संजय बोदीले, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी बोबडे उपस्थित होते.