सोनाई कंपनीविरोधात धनगर समाजाचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:13 PM2024-07-05T15:13:14+5:302024-07-05T15:14:04+5:30
Chandrapur : पाऊण महिना लोटूनही शेळ्यांच्या मृत्यूची दिली नाही नुकसानभरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील सोनाई प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कंपनीच्या समोरील आवारात १४ जून रोजी फेकण्यात आलेले विषारी टाकाऊ खाद्यपदार्थ खाल्ल्याने तेथे चरत असलेल्या हरिचंद्र जिगरवार यांच्या आठ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मोबदला देण्याचे कंपनीने कबूल केले होते. मात्र, जवळपास पाऊण महिना लोटूनही मोबदला मिळाला नसल्याने ४ जुलै रोजी सदर कंपनीसमोरच वाढोणा येथील धनगर (कुरमार) समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
तालुक्यातील वाढोणा परिसरात कामे सुरू असल्याने वाढोणा येथे सोनाई प्रा. लि. कंपनी उभारण्यात आली आहे. या कंपनीसमोर भरपूर खुला परिसर आहे. कंपनीच्या आवाराबाहेरील बाजूत कंपनीच्या लोकांनी जीवितहानी घडवणारे टाकाऊ पदार्थ फेकून दिले होते. त्या ठिकाणी धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्या चरत असताना तेथील पदार्थ खाल्ल्याने हरिचंद्र जिगरवार यांच्या आठ शेळ्या मृत पावल्या. तर काही शेळ्या आजारी पडल्या. कंपनीने शेळीमालक हरिचंद्र जिगरवार यांना मोबदला देण्याचे कबूल केले. परंतु, पाऊण महिना लोटूनही आतापर्यंत कुठलीच नुकसानभरपाई दिली नाही. म्हणून धनगर समाज व गावकऱ्यांनी सोनाई कंपनीसमोरच गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनामध्ये यांचा सहभाग
या आंदोलनामध्ये नागभीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष कृष्णा गंजेवार यांच्या नेतृत्वात नागोजी चौडेवार, धनगर समाजप्रमुख युवराज डेकरवार, हरिचंद्र जिंगरवार, रवींद्र येगेवार, बाबुराव ओगुवार, गुवार, रमेश कोमावार, विनायक बुडमेवार, बाबुराव नसकु- लवार, लक्ष्मण ओगुवार, गणेश उईनवार, आनंदराव नस्कुलवार, चक्रधर झोडे, लीलाधर सोनवाणे, स्वप्निल आंबोरकर, एकनाथ जिगरवार, दौलत पोतरजवार, पुरुषोत्तम बुडमेवार, मयूर परसवार, मनोज कंकलवार, बंडू उईनवार, मंगेश अन्नाचार, युवराज उईनवार, भास्कर देवेवार आदींचा सहभाग होता.