सिंदेवाही तालुक्यात धानपीक धोक्यात
By admin | Published: August 20, 2014 11:26 PM2014-08-20T23:26:39+5:302014-08-20T23:26:39+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्याची ‘धान उत्पादक’ तालुका म्हणून ओळख आहे. यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले. आता शेतकरी दमदार पावसाची वाट बघत असल्याचे चित्र आहे.
मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली. मात्र निसर्गाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. शेतातील विहिरीचे पाणी देवून पऱ्हे मोठे केले. दरम्यान जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. तीन नक्षत्रे कोरडी गेल्यावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पऱ्ह्यांना फायदा झाला. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर पंप सिंचन व्यवस्था आहे. त्या शेतकऱ्यांनी रोवणी केली. पण जे शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आहे. त्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत रोवणी केलेली नाही. फक्त पऱ्हे जगविण्याचे काम सुरू आहे. पावसाअभावी धानपीक खरीप हंगाम धोक्यात आला असून आता दमदार पावसाची गरज आहे.या तालुक्यातील तलाव, बोड्या, शेततळे अद्यापही कोरडेच असून नदी-नाल्यांना पाणी नाही. ज्या शेतकऱ्यांकडे कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादनापासून मुकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात ४० टक्क्यापेक्षा कमी रोवणीची कामे झाली आहे. ६० टक्के शेतकऱ्यांची रोवणी झालेली नाहीत. सिंदेवाही तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून शेती करीत आहेत.
येथील गडमौशी तलाव पाहिजे त्या प्रमाणात भरलेले नाही. त्यामुळे ३०० हेक्टरवरील धान पऱ्हे रोवणीच्या प्रतिक्षेत आहेत. रोवणी झाली म्हणजे पिके हाती येत नाहीत. त्याला पावसाची गरज आहे. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी घोषित केले आहेत. त्यात सिंदेवाही तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे. सिंदेवाही तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)