धर्मशाळेचा वाद पोलीस ठाण्यात
By admin | Published: September 21, 2015 12:44 AM2015-09-21T00:44:05+5:302015-09-21T00:44:05+5:30
राजुरा शहरातील भारत चौकात शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे.
राजुरा : राजुरा शहरातील भारत चौकात शंभर वर्षापूर्वीची धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा जीर्ण अवस्थेत असुन त्याला पाडण्याची परवानगी मागितली. या धर्मशाळेची नगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे. मात्र ही मालमत्ता वक्फ बोर्डची असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे भारत चौकातील धर्मशाळेचा वाद राजुरा पोलीस ठाण्यात पोहचला.
यादरम्यान, राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांनी दोन्ही धर्माच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत दोन तास चर्चा केली. या चर्चेत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात या धर्मशाळेची कागदपत्रे नगर पालिका रेकॉर्डला असल्यामुळे जीर्ण धर्मशाळा पाडण्यात यावी, त्याचे साहित्य त्याच जागेवर एका ठिकाणी ठेवण्यात यावेत. या धर्मशाळेचा जो बोर्ड आहे, तो तसाच ठेवण्यात यावा. वक्फ बोर्ड जर न्यायालयात गेले. नगर पालिकेला त्याची प्रत दिल्यानंतर नगर पालिकेने हा धर्मशाळेचा बोर्ड काढुन त्या ठिकाणी नगरपालिकेचा बोर्ड लावण्यात यावा. त्यामध्ये मालमत्ता क्रमांक टाकून वाद न्यायालयात मिटेपर्यंत या ठिकाणी कुणीही बांधकाम करू नये. जो कोणी या अटीचा भंग करेल, तो कारवाईस पात्र राहील असे ठरविण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक स्वामी येरोलवार, शरिफ सिद्दीकी, सय्यद सखावत अली, सुभाष रामगिरवार, बाब बेग, राजु डोहे, सोमेश्वर आईटलावार, राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाक उपस्थित होते. शंभर वर्षापुर्वीची धर्मशाळा जीर्ण अवस्थेत असल्यामुळे पोलीस आणि राजुरा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पाडण्यात आली.
राजुरा शहरात गणेश उत्सव सुरू असुन राजुरा शहरात रविवारी दुपारी धर्मशाळेचा वाद निर्माण झाला होता. परंतु राजुरा येथील ठाणेदारांनी योग्यरितीने हाताळून वाद सद्या तरी मिटविण्यात यश मिळविले आहे. (शहर प्रतिनिधी)